केंद्र शासनाने पेट्रोलची दरवाढ केल्याने त्याचा निषेध करण्यासाठी कल्याण शहर काँग्रेसतर्फे सहजानंद चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत दुचाकी, चार चाकी वाहने धक्का मारत नेली. यात धक्का मारो आंदोलन कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र शासनाच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आमदार संजय दत्त, नगरसेवक सचिन पोटे, विश्वनाथ राणे, ब्रिजकिशोर दत्त, सुरेंद्र आढाव, मुन्ना तिवारी आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवणारे केंद्र सरकार जनतेचा विश्वासघात करीत आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे मूलभूत गरजांच्या दरात वाढ होते. त्यामुळे ही दरवाढ रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने नायब तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्याकडे केली. लोटत, धक्के मारत वाहने रस्त्यावरून नेण्यात येत असल्याने काही काळ सहजानंद चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.