वसई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने देशातील टाळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणच्या किराणा मालाच्या दुकानात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने ग्राहकांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होऊ  लागली आहे.

वसईतील बहुतेक ठिकाणच्या किराणा मालाच्या दुकानात दैनंदिन गरजेसाठी लागणाऱ्या सामानाचा पुरवठा हा टाळेबंदीमुळे कमी प्रमाणात होत आहे तर बहुतेक वस्तू या किराणा मालाच्या दुकानात पोहचत नसल्याने ग्राहकांना ज्या वस्तू हव्या आहेत, त्या मिळत नसल्याचे चित्र ठिकठिकाणी  दिसून आले आहे. ग्रामीण भागाच्या ठिकाणी असलेल्या किराणा दुकानात हीच स्थिती पाहायला मिळत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

सध्या टाळेबंदी असल्याने अनेक दुकाने ही काही वेळेपुरताच उघडी असतात. त्यामुळे वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. त्यामध्ये सर्वच ग्राहकांना वस्तू मिळत नसल्याने ग्राहकांचा हिरमोड होऊ  लागला आहे, तर वसईतील सत्पाळा येथे १० ते १२ हजार लोकसंख्या असून केवळ एकच किराणा दुकान असल्याने नागरिकांना वस्तू पुरेशा मिळत नाहीत. यासाठी ग्राहकांना चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करून राजोडी गावाच्या ठिकाणी व इतर ठिकाणी किराणा सामान खरेदी करण्यासाठी जावे लागत असल्याचे चार्ली रोझारीओ यांनी सांगितले आहे. वितरकांकडूनच माल उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना येथून तिथे धावपळ करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाने किराणा दुकानात वस्तूंचा पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी प्रयत्न करून सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा असेही त्यांनी सांगितले आहे.

औषधांचाही तुटवडा

टाळेबंदीत शासनाने जरी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवली असली तरी औषधांच्या दुकानातही नियमित लागणारी औषधे मिळत नाहीत. नेहमीच्या लागणाऱ्या औषधांची वितरकांकडे मागणी केली जाते. परंतु औषधांचा मालच दुकानात पोहचत नसल्याने रुग्णांनाही ही मिळत नसल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.