निवडणुकीनिमित्त पालिकेचा उपक्रम; पंखे, पाणी, शौचालयाची सुविधा

भिवंडी महापालिका निवडणुकीसाठी शहरात सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग बुथ) उभारण्यात येणार असून या केंद्रामध्ये अंध, अपंगांसाठी रॅम्प, पंखे, पाणी, शौचालये आणि मतदान माहिती केंद्र अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय, मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवरील रांगेत उभे असलेल्या मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी केंद्रांवर बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. भिवंडीत पहिल्यांदाच निवडणुकीत अशा प्रकारची मतदान केंद्रे उभारली जाणार असून त्याचा फायदा भिवंडीकरांना होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

भिवंडी महापालिकेची निवडणूक २४ मे रोजी होत असून या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत ४९.०६ टक्के इतके मतदान झाले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा तसेच यंदा मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात मतदान जनजागृतीसाठी प्रशासनाने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापाठोपाठ आता मतदान केंद्रांवरील असुविधांमुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होऊ नये म्हणून प्रशासनाने सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला असून त्या ठिकाणी मतदारांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार यंदाच्या निवडणुकीत शहरामध्ये सोयीसुविधायुक्त मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी दिली. भिवंडी महापालिका निवडणुकीच्या कामकाजासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

सुविधा काय?

  • शहरात एकूण ६४४ मतदान केंद्रे असून या सर्वच ठिकाणी सोयीसुविधायुक्त मतदान केंद्र उभारण्यात येणार आहे.
  • अंध, अपंगांसाठी रॅम्पची सुविधा करण्यात आली आहे.
  • पंखे, पाणी, शौचालये आणि मतदान माहिती केंद्र अशा सुविधाही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
  • मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत.
  • मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवरील रांगेत उभे असलेल्या मतदारांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.