वसई किल्ल्यावरील प्रेमीयुगुलांची छायाचित्रे काढल्याप्रकरणी चौकशीचे आदेश

वसई किल्ल्यात दुर्गमित्रांनी प्रेमीयुगुलांविरोधात सुरू केलेली बेकायदा ‘नैतिक पोलीसगिरी’ अखेर बंद करण्यात आली. किल्ल्यात अश्लील चाळे करणे गैर असले तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाच नसल्याने या मोहिमेविरोधात तीव्र पडसाद उमटले आहेत. जर ‘नैतिक पोलीसगिरी’ करणाऱ्या संस्थेविरोधात तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल, असे पुरातत्त्व खात्याने सांगितले. वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

‘किल्ले वसई मोहीम’ या संस्थेने गेल्या काही दिवसांपासून वसई किल्ल्यातील अनैतिक प्रकारांविरोधात मोहीम सुरू केली होती. किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांचे ओळखपत्रे तपासली जात होती, तसेच किल्ल्यात आलेल्या प्रेमीयुगुलांना बाहेर काढले जात होते. अश्लील कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगुलांची छायाचित्रे पुरावे म्हणून काढली जात होती, तसेच त्यांच्या ओळखपत्रांची छायाचित्रे घेऊन त्यांच्या महाविद्यालयाला कळवण्यात येत होते. या संस्थेच्या या बेकायदा ‘नैतिक पोलीसगिरी’चे वृत्त शनिवारी ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. या बातमीचे तीव्र पडसाद वसईत उमटले. किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी काही जणांनी या मोहिमेचे स्वागत केले, तर कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाच नाही, असे सांगत अनेकांनी या मोहिमेवर टीका केली. या बातमीनंतर पोलीस आणि पुरातत्त्व खात्याने गंभीर दखल घेतली. त्यामुळे ही नैतिक पोलीसगिरी तात्काळ बंद करण्यात आली आहे. वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोशन राजतिलक यांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रेमीयुगुलांची छायाचित्रे काढण्याचा, त्यांना हटकण्याचा अधिकार कुणालाच नाही, असे ते म्हणाले. प्रेमीयुगुलांची अशी छायाचित्रे काढली असतील तर तो गुन्हा आहे. याबाबत चौकशी करण्याचे आदेश वसई पोलिसांना दिले जातील, असे ते म्हणाले.

या मोहिमेबाबत आम्हाला कुठलीच कल्पना अथवा पत्र किल्ले वसई मोहीम या संस्थेने दिले नसल्याचे वसईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले. किल्ल्यातील अश्लील कृत्य, गैरप्रकार यावर आम्ही सातत्याने कारवाई करतो, असेही ते म्हणाले.

पोलीस, पुरातत्त्व खात्यावर आरोप

‘लोकसत्ता’त आलेली बातमी आणि झालेल्या विरोधामुळे ही मोहीम थांबवत असल्याचे किल्ले वसई मोहिमेचे अध्यक्ष श्रीदत्त राऊत यांनी सांगितले. पोलीस आणि पुरातत्त्व खाते कारवाई करत नाही म्हणून आम्ही कारवाई केली तर काय बिघडले, असा सवाल त्यांनी केला. प्रेमीयुगुलांकडून पैसे उकळणाऱ्या पुरातत्त्व खात्याची या मोहिमेमुळे चिरीमीरी बंद झाल्याने त्यांनी या मोहिमेला विरोध केल्याचा आरोप त्यांनी केला. किल्ल्याचे पावित्र्य जपावे हा आमचा उद्देश आहे. कुणाला मारहाण केलेली नाही, कुणाला शिवीगाळही केलेली नाही, असे राऊत म्हणाले. पोलिसांनी आतापर्यंत किती गुन्हे नोंदविले, पुरातत्त्व खात्याचे सुरक्षारक्षक काय करतात, आम्ही ओळखपत्र का विचारू नये, असे सवालही त्यांनी केले. आम्ही ही छायाचित्रे कुणाला पाठवली नाहीत, ती केवळ आमच्या पुराव्यासाठी काढून ठेवल्याचा दावा एका दुर्गमित्राने केला आहे.

प्रेमीयुगुलांची छायाचित्रे काढणे हा प्रकार गंभीर आहे. कुठलाही अनैतिक प्रकार आढळल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. कायदा कुणी हातात घेऊ  नये. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

– रोशन राजतिलक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई

ही मोहीम अयोग्य आहे. जर या मोहिमेमुळे कुणाला त्रास झाला असेल आणि आमच्याकडे तशा तक्रारी आल्या तर आम्ही त्याबाबत पोलिसांकडे तक्रार करून कारवाई करू.

– कैलास शिंदे, साहाय्यक संवर्धक अधिकारी, वसई किल्ला