बदलापुरातील आश्रमावर हल्ला प्रकरणात दरोडा व दंगल यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवक आशिष दामले याला कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयाने शनिवारी अटकपूर्व जामीन नाकारला.
या प्रकरणाबाबत सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी सुनावणी झाली होती. या सुनावणीच्या वेळी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. जे. भारूका यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकली होती. या वेळी दामलेच्या वकिलांनी दामलेची बाजू न्यायालयात मांडली होती.
या सुनावणीच्या शनिवारी दिलेल्या निकालात न्यायालयाने आशिष दामलेला अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे अद्यापही फरार असलेल्या दामलेला पोलिसांकडे हजर राहण्यावाचून पर्याय शिल्लक न राहिल्याचे दिसून येत आहे.
याबाबत पुढे दाद मागण्यासाठी दामलेचे वकील उच्च न्यायालयात जाणार असल्याचे समजते आहे. दरम्यान, या प्रकरणाला सध्या वेगळेच वळण लागले असून सुरुवातीला दरोडय़ाचे वाटणारा हा प्रकार प्रेम प्रकरणातून झाल्याचे समजते असून साधना भवन आश्रमाचे प्रमुख नरेश रत्नाकर यांच्या पुतणीसोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून हा सारा प्रकार झाल्याचे बोलले जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 6:59 am