विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा जीव धोक्यात; पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी

विरार पूर्वेकडील फुलपाडा परिसरातील रहिवाशांना जीव मुठीत घेऊन केवळ एका गर्डरवरून प्रवास करावा लागत आहे. परिसरातील नाल्यावर हा लोखंडी गर्डर टाकण्यात आला असून पलीकडे जाण्याऐवजी या लोखंडी गर्डरशिवाय दुसरा पर्याय नाही. परिसरातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना जीव धोक्यात घालून येथून प्रवास करावा लागतो. पालिकेने या नाल्यावर छोटासा पूल बांधावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

फुलपाडा येथील गांधी चौकातील रामचंद्र नगर परिसरात हा नाला आहे आजूबाजूला चार शाळा आहेत. या ठिकाणी नागरिकांना ये-जा करण्यासाठी दुसरा मार्ग हा एक किमी अंतरावर आहे. त्यामुळे नाल्याचा मार्ग जवळ असल्याने या गर्डरवरूनच ये-जा करावी लागते. या गर्डरला कसलाही आधार नाही. त्यामुळे कुणाचा धक्का लागल्याने किंवा तोल गेल्याने थेट नाल्यात पडण्याची भीती आहे. याआधी असे प्रकार झाल्याचे बोलले जाते. अनेक शालेय विद्यार्थी, लहान मुले या गर्डरवरून जातात. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे. येथील रहिवाशांसाठी ये-जा करण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

एका बांधकाम व्यावसायिकाने या ठिकाणी हा गर्डर टाकला आहे. त्यामुळे कोणतीही जीवितहानी होण्याआधी त्याची माहिती घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे आणि नाल्यावरील गर्डर काढण्यात येणार आहे.         – एकनाथ ठाकरे, पालिका अभियंता