News Flash

शालेय शुल्काचा निर्णय पालकांच्या संमतीने घ्या

शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच विविध शाळा प्रशासनांकडून सक्तीने पूर्ण शुल्क तसेच काही शाळांकडून वाढीव शुल्क वसुली केली जात असल्याचा आरोप अंबरनाथमध्ये होत होता.

सक्तीने शुल्क वसुलीबाबत आयोजित बैठकीत पालकांचा सूर

अंबरनाथ : शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच विविध शाळा प्रशासनांकडून सक्तीने पूर्ण शुल्क तसेच काही शाळांकडून वाढीव शुल्क वसुली केली जात असल्याचा आरोप अंबरनाथमध्ये होत होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी, विविध शाळांचे मुख्याध्यापक, पालक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली असून त्यामध्ये शुल्कासंदर्भातील कोणताही निर्णय पालक-शिक्षक संघाच्या बैठकीनंतर सर्वसंमतीनेच घेण्याचा सूर पालकांनी लावला. आ. बालाजी किणीकर यांनी अनावश्यक शुल्क वगळण्याच्या सूचना उपस्थित शाळांच्या मुख्याध्यापकांना यावेळी केल्या.

करोनाच्या संकटामुळे शाळा बंद असल्या तरी ऑनलाइनद्वारे शिक्षण अविरतपणे सुरू आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास सुरुवात झाली असून प्रवेश प्रक्रिया आणि शुल्कासंदर्भातील अनेक तक्रारी गेल्या काही दिवसांमध्ये वाढल्या होत्या.

शहरात एका खासगी शाळेबाहेर काही पालकांनी एकत्र येत शुल्कासंदर्भात शाळेला जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याचे नुकतेच दिसून आले होते. तसेच शाळेतील प्रवेश शुल्क आणि इतर शुल्कासंदर्भात तक्रारी वाढत असल्याचे चित्र होते. त्यामुळे अंबरनाथचे आ. बालाजी किणीकर यांनी सोमवारी अंबरनाथचे गट शिक्षणाधिकारी रा. ध. जतकर यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन केले होते.

या बैठकीत कोकण विभाग मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, अंबरनाथ नगरपालिकेचे शिक्षण विभाग अधिकारी गजानन मंदाडे, विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि पालक वर्गाचे प्रतिनिधी उपस्थित होते. करोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या असून अनेकांचे उत्पन्नाचे स्रोत संपुष्टात आले आहेत. त्यामुळे जेमतेम उत्पन्नात उदरनिर्वाह सुरू असताना अशावेळी शाळांनी शुल्क वाढवणे चुकीचे असल्याचे मत किणीकर यांनी व्यक्त केले. शुल्कवाढीचा निर्णय परस्पर शाळांनी घेऊ नये तसेच पालक-शिक्षक संघाची बैठक घेऊन त्यातच सर्वानुमते निर्णय जाहीर करावेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अनेक मुख्याध्यापकांनी आपल्या समस्या मांडल्या, तर पालकवर्गाच्या प्रतिनिधींनीही शाळांच्या मनमानीवर बोट ठेवले.

अनावश्यक शुल्क माफ करावे

संकटाच्या काळात पालकांकडून पूर्ण शुल्क घेण्याऐवजी टर्म शुल्क, टय़ुशन शुल्क अशा प्रकरचे शुल्क घेऊन इतर अनावश्यक शुल्क माफ करावे, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना दिल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 1:05 am

Web Title: decide school fees consent parents ssh 93
Next Stories
1 मुरबाडजवळ जंगलात दोन तरुणींचे मृतदेह
2 ‘मुंब्रा बाह्यवळण’ चार महिने बंद?
3 पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी
Just Now!
X