नीलेश पानमंद, ठाणे

वाहन चोरीच्या गुन्ह्य़ातील मुख्य आरोपी संदीप लागू याला फसवणुकीच्या गुन्ह्य़ात आठ वर्षांपूर्वी अटक झाली होती. या गुन्ह्य़ात कारागृहात बंदिस्त असताना त्याची ओळख वाहन चोरणाऱ्या टोळीच्या म्होरक्यासोबत झाली. कारागृहातच या दोघांनी वाहन चोरीची योजना आखली आणि तेथून बाहेर आल्यानंतर वाहन चोरीतून लाखो रुपयांची माया जमविण्यास सुरुवात केल्याची बाब तपासात समोर आली आहे. तसेच कर्नाटक आणि राजस्थानातील शेतकऱ्यांना ही वाहने विकली जात असल्याचे तपासात पुढे आले आहे.

मुंबईतील जोगेश्वरी भागात संदीप मुरलीधर लागू राहतो. त्याने रसायनशास्त्रातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच विधि शाखेच्या द्वितीय वर्षांपर्यंत शिक्षण घेतले आहे. २०११ मध्ये एका फसवणुकीच्या गुन्ह्य़ात संदीप याला अटक झाली होती आणि त्यानंतर त्याची रवानगी कारागृहात झाली होती. तिथे बंदिस्त असताना त्याची एका वाहन चोरासोबत ओळख झाली. हा वाहन चोर उत्तर प्रदेशचा रहिवासी असून तो वाहन चोरीच्या टोळ्यांचा म्होरक्या आहे. संदीपने आखली आणि कारागृहातून बाहेर पडल्यानंतर ठरलेल्या योजनेनुसार वाहन चोरीतून लाखो रुपये कमविण्यास सुरुवात केली. कर्नाटकमध्ये राहणारे सादिक मेहबूब खान मुल्ला आणि अल्ताब अब्दुलगणी गोकाक हे दोघे चोरीची वाहने विकण्याचे काम करतात. हे दोघे जण वाहन खरेदीसाठी ग्राहक शोधायचे. ग्राहक मिळाल्यानंतर संदीपला त्यांना कोणते वाहन हवे आहे, याची माहिती द्यायचे. त्यानुसार संदीप त्या वाहन चोरांच्या टोळीमार्फत ते वाहन चोरी करायचा. चोरलेले वाहन पुण्याच्या गोदामात ठेवले जायचे. या वाहनांच्या चेसीज आणि इंजीन क्रमांकात फेरफार करून नागालँडमधील प्रादेशिक परिवहन विभागात नोंदणी केली जायची. त्यानंतर हे वाहन सादिकमार्फत संबंधित ग्राहकाला विकले जायचे, अशी या टोळीची कार्यपद्घत असल्याचे तपासात समोर आले आहे.

चोरी सोपी म्हणून..

पिकअप वाहनांच्या इंधन टाकीची चावी व वाहनाची चावी एकसारखीच असते. त्यामुळे चोरटे पिकअप वाहनाच्या इंधन टाकीचे झाकण तोडायचे. या वाहनाशेजारीच दुसऱ्या वाहनात बसून बनावट चावी बनवायचे आणि तिचा वापर करून वाहन चोरायचे, अशी टोळीची कार्यपद्धत होती. त्यामुळे चोरटय़ांनी ६९ ही वाहने चोरली. एका वाहन चोरीमागे चोरटय़ाला ४० ते ५० हजार रुपये कामाचा मोबदला म्हणून दिला जायचा. वाहन नोंदणी तसेच अन्य कामांसाठीही एक ते दीड लाख रुपये खर्च केले जायचे. त्यानंतर हे वाहन मूळ  चार ते पाच लाखात विकले जायचे. त्यामुळे एका वाहनामागे त्यांना दोन ते तीन लाख रुपये मिळत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.