नववर्ष स्वागत यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी डोंबिवलीत येत असून त्यांना खूष करण्यासाठी सध्या येथील रस्त्यांवरील खड्डय़ांची सिंगापुरी पद्धतीने युद्ध पातळीवर डागडुजी करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.  
गेले तीन वर्ष रखडलेल्या सीमेंट रस्त्यांमुळे धूळ आणि वाहतूक कोंडीचा सामना करणारे डोंबिवलीकर अचानक सुरू असलेला हा चकचकाट पाहून ‘मुख्यमंत्री साहेब आमचे दैन्य संपवण्यासाठी रोज या’ अशी आर्त साद घालू लागले आहेत.
विशेष म्हणजे घाईघाईने उरकण्यात आलेल्या या कामांसाठी रेतीऐवजी खडीची कच, रस्ता दुभाजकांसाठी कच्च्या सीमेंटचे खांब, या रस्त्यांच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी दुभाजकांच्या मध्ये तांबडी माती आणि त्यात हिरवीगार झाडे लावण्यात आली आहेत. मुख्यमंत्र्यांचे वाहन खड्डय़ात कुठेही आचके खाऊ नये म्हणून सीमेंट रस्त्यांच्या तुकडय़ांमध्ये पेव्हर ब्लॉक घुसवण्यात आले आहेत. पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी, जोडाजोडीची कामे करण्यासाठी रेतीऐवजी खडीची कच वापरण्यात येत आहे.
दुभाजकांना पिवळा काळा रंग देण्याचे काम सुरू आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी रस्ता ते पत्रीपुलापर्यंतच्या दुभाजकांना काळा पिवळा रंग देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
डोंबिवलीच्या घरडा सर्कल या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्र्यांचे आगमन होणार असल्याने नेहमी खड्डे, धुळीने भरलेला रस्ता डांबर टाकून चकचकीत करण्यात आला आहे. चौकात मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे ढीगभर फलक राजकीय पुढाऱ्यांनी लावले आहेत. घरडा सर्कल ते टिळक चौक सीमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या शेलार चौकात गेल्या दोन महिन्यापासून काम रखडले आहे. या भागात घाईघाईने सीमेंट रस्त्यांच्या मध्ये असलेले खड्डे पेव्हर ब्लॉक लावून बुजवण्याचे काम सुरू आहे. महिनोनमहिने रस्त्यांच्या कोपऱ्याला पडलेल्या केबल उचलण्यात येत आहेत.
गेल्या तीन वर्षांपासून कल्याण, डोंबिवलीत अतिशय संथगतीने सुरू असलेल्या या कामांमुळे शहरात अभूतपूर्व वाहतूक कोंडी सुरू आहे. जागोजागी रस्ते खणून ठेवले आहेत. त्यामुळे धुळीचा त्रास होऊन अनेक नागरिक आजारी आहेत. अशा परिस्थितीत केवळ मुख्यमंत्री येणार म्हणून आपल्या सुंदर शहराची टिमकी वाजवण्यासाठी पालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या आग्रहाने सुरू केलेल्या या घाईघाईच्या कामां विषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री येणार म्हणून रस्त्यांचा सुंदर देखावा उभारणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मानपाडा रस्ता, रामनगर बालभवन रस्ता, संगीतावाडीतील मुख्य, गल्ली
बोळातील रस्त्याने प्रवेश करावा म्हणजे शहरातील रस्त्यांची वाताहत, पालिका अधिकाऱ्यांची उदासीनता, कर्तृत्वान नगरसेवकांचा कामाचा उरक पाहण्यास मिळेल अशी मागणी लोकांकडून केली जात आहे.