19 October 2019

News Flash

पूर नाल्यांपर्यंतच मर्यादित राहील!

तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार उपाययोजना राबवण्याचे आयुक्तांचे आश्वासन

पालिकेचे कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड, उपमहापौर प्रकाश रॉड्रीग्ज, पालिका आयुक्त बी. जी. पवार आणि अग्निशमन विभागाचे प्रमुख दिलीप पालव आदी. (छायाचित्र : दीपक जोशी)

तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार उपाययोजना राबवण्याचे आयुक्तांचे आश्वासन; ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’मध्ये वसईच्या पूरस्थितीबाबत साधकबाधक चर्चा

वसई : वसई विरार शहरात जुलै २०१८ मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती होऊ  नये यासाठी आयआयटी व निरी या संस्थेकडून गेल्या १५ दिवसां पूर्वी अहवाल प्राप्त झाला असून, या अहवालाच्या अनुषंगाने शहरातील नालेसफाई करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रात घडलेल्या या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ  नये याकरिता महापालिका सर्व सुचवलेल्या उपाययोजना करेल तसेच नागरिकांनी उपस्थित केलेल्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असे आश्वासन वसई विरार महापालिकेचे आयुक्त बी. जी. पवार यांनी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात दिले.

वसईत गतवर्षीसारखी पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी काय उपाययोजना करता येतील, हे जाणून घेण्याबरोबरच पुराचे संकट यंदा थोपवता येईल का, याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ या कार्यक्रमाचे शनिवारी वसईत आयोजन करण्यात आले होते. यावेळी समीर वर्तक आणि मार्कुस डाबरे या पर्यावरणवादी व सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी वसईत पूर का आला, याचे विश्लेषण केले. महानगरपालिका नैसर्गिक नाल्यांवर झालेला भराव, शहरातील अतिक्रमण, वाढलेली लोकसंख्या, पाणथळ जागेवर होत असलेले अतिक्रमण, झालेले नागरीकरण तसेच शहरात येत असलेले विनाशकारी प्रकल्प व इतर कारणे या महापुराला जबाबदार असल्याचे मत या दोन्ही वक्त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.

सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर महापालिकेच्या वतीने आयुक्त बी. जी. पवार आणि कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड तर सत्ताधारी पक्षाच्या वतीने उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज यांनी उत्तरे दिली. गेल्या वर्षी निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने महानगरपालिकेने नालेसफाईचे काम जोमाने सुरू केले आहे असे आयुक्त बी.जी पवार यांनी सांगितले.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी) आणि भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), या संस्थांकडून प्राप्त झालेला अहवाल सर्वासाठी खुला करण्यात येणार आहे. यामध्ये नमूद केलेल्या उपाययोजना प्रशासनाकडून सुटत नसल्यास नागरिकांनी त्यासंबंधी किंवा कामामध्ये त्रुटी असल्यास आपल्याला कळवावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. या अहवालानुसार सर्व कामे आणि नालेसफाई होणार असल्याचे सांगत यासंदर्भात आपण गेल्या आठवडय़ात सफाई झालेल्या नाल्याची खोलीची प्रत्यक्ष पाहणी केल्याची माहिती त्यांनी दिली.

पश्चिम रेल्वे तर्फे बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीमुळे पाण्याचा निचरा होण्यास अडचण होणार असल्याने रेल्वे प्रशासनाला तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला या संदर्भात सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील काही खोलगट भागात पाणी साचत असल्याने पाणी जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा शोध घेण्यास सोबत मोठय़ा क्षमतेचे सक्शन पंप लावण्याचा विचार प्रशासन करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुक्त म्हणतात..

* शहरातील पूरपरिस्थितीला नाल्यांची स्थिती, अनधिकृत बांधकामे, शहरातील अस्थायी लोकसंख्या (फ्लोटिंग पॉप्युलेशन) अशी विविध कारणे जबादार असून त्याबाबतीत टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यात येईल.

* शहरातील अनधिकृत बांधकामांवर टप्प्याटप्प्याने कारवाई करणार. नैसर्गिक नाले तसेच नदीकिनारी असलेल्या बेकायदा बांधकामांवर सर्वप्रथम कारवाई करणार.

* मिठागर आणि पाणथळ जागेत बेकायदा बांधकामे झाल्याच्या तक्रारी आल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल.

*  तिवरांची झाडे असलेल्या भागात तसेच सागरी किनारा नियंत्रण क्षेत्र (सीआरझेड) क्षेत्रामध्ये नालेसफाई करताना अडचणीत येत असून त्या भागातील नाल्यांची लांबी व रुंदी सीआरझेड प्राधिकरणासोबत एकत्रपणे बैठक घेऊन निश्चित करण्यात येईल.

* शहरातील सखल भागांत पाणी साचल्यास आपत्कालीन व्यवस्था म्हणून होडय़ा, जीवरक्षक, पोर्टेबल उपसा पंप, तरंगणारे पंप यांची सज्जता ठेवणार.

– येत्या दोन महिन्यांत फेरीवाला धोरण अंतिम करून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणार.

*  कचरा गोळा करण्याच्या प्रणालीतील त्रुटी दूर करून मोठय़ा निवासी संकुलांत ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी प्रयोग करणार.

* निर्मळ परिसरात बुजवण्यात आलेल्या नैसर्गिक नाल्याचे पावसाळ्यापूर्वी रुंदीकरण करण्यात येईल.

* सनसिटी भागात बांधण्यात आलेल्या चार नाल्यांची उंची नैसर्गिक नाल्यापेक्षा अधिक असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे, त्या ठिकाणी क्रॉस गटारे बांधण्यात येतील व व तक्रारी संदर्भात पाहणी करण्यात येईल.

First Published on May 14, 2019 2:40 am

Web Title: discussions about vasai flood in loksatta loudspeaker