शहराबाहेर भंडर्ली येथे शास्त्रोक्तकचरा विल्हेवाट; शेतकऱ्यांशी चर्चा करून भाडेतत्त्वावर जमीन घेणार

ठाणे : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली दिवा कचराभूमी हटवण्याची मागणी आता पूर्ण होणार आहे. स्थानिकांचा विरोध, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसा आणि डायघर येथील कचराप्रकल्प उभारणीस होत असलेला विलंब या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिकेने दिव्यातील कचराभूमी महिनाभरात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कचराभूमी शहराबाहेरील भंडर्ली येथे हलवण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज ९५० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. मात्र, या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी महापालिकेची स्वत:ची कचराभूमी नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून दिवा भागात संपूर्ण शहराचा कचरा टाकण्यात येतो.  या कचराभूमीवर दुर्गंधी पसरण्याचा तसेच सातत्याने आगी लागण्याच्या घटना घडतात. त्यामुळे ही कचराभूमी बंद करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक क्षमतेचे प्रकल्प उभारले नाहीत म्हणून हरीत लवाद आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पालिकेला वांरवार नोटीसा येत आहेत. त्यातच डायघर येथे कचराप्रकल्प उभारणीस विलंब होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जुलै महिन्यात महापौर नरेश म्हस्के यांनी एक बैठक आयोजित केली होती. यामध्ये कचरा विल्हेवाटीसाठी महापालिका हद्दीबाहेर भूखंड भाडय़ाने घेऊन दिवा कचराभूमी बंद करण्याचे आदेश महापौर म्हस्के यांनी दिले होते. यानंतर प्रशासनाने पालिका हद्दीबाहेर जागेचा शोध घेऊन भंडर्ली येथे कचरा विल्हेवाटीसाठी जागा भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला होता. या संबंधीच्या प्रस्तावास बुधवारच्या सर्वसाधरण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंजुरी दिली. डायघर येथील कचरा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत भंडर्ली येथे कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

भंडर्लीतील शेतकऱ्यांची संमती

भंडर्ली येथील शेतकऱ्यांनी कचरा विल्हेवाटीसाठी जागा भाडेतत्त्वावर देण्याची संमती दर्शविली आहे. ही जमीन सुमारे ४ हेक्टर इतकी आहे. या जागेसाठी पालिका शेतकऱ्यांसोबत दहा वर्षांचा करार करणार आहे. ही जमीन रेडीरेकनर दराने भाडय़ाने घेण्याचा ठराव यापूर्वीच सर्वसाधरण सभेने केला आहे. परंतु मे. के. के. इन्फ्रा या कंपनीने ही जमीन प्रतिचौरस फूट १० रुपये दराने आणि प्रतिवर्ष १० % दरवाढ या दराने १० वर्षांकरिता देणेबाबत कळविले आहे. रेडीरेकनर दराने ४ हेक्टर ४७ आर जमीन भाडेतत्त्वावर घेणेकरिता प्रतिचौरस फूट २ रुपये ६ पैसे इतका दर असून या दराने मासिक ९ लाख ९५ हजार ७६७ रुपये तर, वर्षांला १ कोटी १९ लाख ४९ हजार २०४ रुपये खर्च येणार आहे. १०% दरवाढीनुसार १० वर्षांकरिता ९२ कोटी २ लाख ७७ हजार २५९ रुपये खर्च अपेक्षित आहे.

सेना-राष्ट्रवादी खडाजंगी

कचरा विल्हेवाटीसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या जागेच्या दराबाबत राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी काही मुद्दे उपस्थित केले. यातूनच महापौर नरेश म्हस्के आणि नगरसेवक राम रेपाळे यांनी प्रस्तावास विरोध आहे का अशी विचारणा केली. त्यावरून सेना-राष्ट्रवादी खडाजंगी झाली. तर, प्रस्तावास विरोध असेल तर दिव्यात यापुढे एकही कचऱ्याची गाडी येऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी दिला.

भाडेदराचा निर्णय गटनेता बैठकीत

कचरा विल्हेवाटीसाठी स्थानिक नागरिकांचा विरोध ही बाब विचारात घेऊन रेडीरेकनर दराने ही जमीन भाडेतत्त्वावर देणे शक्य होणार नसल्याचे मे. के. के. इन्फ्रा या कंपनीने कळविले असून त्याचबरोबर त्यांनी बाजारभावानुसारच ही जागा भाडेतत्त्वावर देण्यास संमती दर्शविली आहे, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले होते. दरम्यान या दराबाबत नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांशी चर्चा करून जागेचे भाडेदर गटनेत्यांच्या बैठकीत निश्चित करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला आहे.