ठाणे/बदलापूर : जिल्हा प्रशासनाच्या आदेशानंतर गेल्या चार दिवसांपासून बंद असलेले भाजी बाजार बुधवारपासून पुन्हा सुरू झाले. मात्र, बहुतांश किरकोळ बाजारांत विक्रेत्यांनी दामदुप्पट दराने भाजीविक्री केल्याचे पाहायला मिळाले. चार दिवसांपासून भाजी बाजार बंद असल्याने ग्राहकांनी नाइलाजाने महाग असतानाही भाजी खरेदी केली.

किरकोळ भाजी विक्रेत्यांकडे कोबी, फ्लॉवर, गिलकी, घोसाळी, भेंडी, शेवगा या भाज्यांचे दर ८० रुपये किलोपर्यंत वाढल्याचे पाहायला मिळाले. तर कारली, भोपळा, दुधी भोपळा, शिमला मिरची अशा भाज्यांनी सत्तरी गाठली होती. हेच दर गेल्या शुक्रवापर्यंत ४० रुपये प्रतिकिलो असे होते. त्यामुळे चार दिवसांची बाजारबंदी सर्वसामान्यांना महागात पडल्याचे दिसून आले.

टाळेबंदीमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. टाळेबंदी किती काळ वाढेल, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे अत्यावश्यक वस्तूंसाठी खरेदी करताना नागरिकांना कसरत करावी लागते आहे. त्यात अचानक वाढलेल्या भाज्यांच्या दरांमुळे नागरिकांना खिशाला चाप बसणार आहे. त्यामुळे या भाजीच्या दरांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी आता होत आहे. विशेष म्हणजे जीवनावश्यक वस्तूंची वाढीव दराने विक्री होणार नाही याबाबत वेळोवेळी पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

बदलापूर पालिकेच्या नियोजनाचा फज्जा

बदलापूर नगरपालिकेने दोन दिवसांपूर्वी भाजी विक्रीसाठी शहरातील दोन ठिकाणे निश्चित केली होती. मात्र विक्रेत्यांनी दोनच ठिकाणी विक्री केल्यास गर्दी होईल असे सांगत त्या ठिकाणी विक्रीस नकार दिला. त्यानंतर दोन ठिकाणांपैकी आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात घाऊक विक्रेत्यांसाठी व्यवस्था करून दिली. मात्र घाऊक विक्रेत्यांनी या विक्रीकडे पाठ फिरवली. त्यामुळे आदर्श विद्यालयाचे प्रांगणात अवघे काही विक्रेते दिसत होते.