मीरा-भाईंदर महापालिकेकडून दुरुस्तीकरिता कोटय़वधी रुपये खर्च

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील विविध ठिकाणी गटारांची झाकणे अद्यापही उघडी व तुटलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या झाकणाच्या दुरुस्तीकरिता पालिका प्रशासनाकडून प्रतिवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ती बदलण्यात येत नसल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

महानगरपालिकेच्या बांधकाम विभागामार्फत शहरात पक्की गटारे बांधण्याचे काम केले जाते.त्यामुळे ही गटारे साफ करण्याकरिता गटारावर झाकणे बसवण्यात येतात. मात्र अनेक वेळा ही झाकणे तुटतात किंवा पूर्ण पणे नष्ट होतात. परिणामी अनेक ठिकाणी या उघडय़ा झाकणाचा त्रास ये-जा करणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागतो. यापूर्वी देखील उघडय़ा झाकणाच्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची देखील घटना घडली आहे. अशी स्थिती असतानाही पालिकेने विविध प्रभागातील गटाराच्या झाकणांच्या दुरुस्तीकडे लक्ष दिलेले नाही.

मीरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गावर दोन्ही बाजूस पालिकेमार्फत पदपथांची निर्मिती करून त्यावरील नाल्यावर झाकणे बसवण्यात आली होती. मात्र या पदपथावर वाहने उभी करण्यात येत असल्यामुळे ही झाकणे गेल्या कित्येक दिवसापासून तुटक्या स्थितीत आहेत. या मार्गावर नागरिकांची मोठय़ा प्रमाणात रहदारी असताना प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे ती बदलण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील तुटलेली झाकणे बदलण्याचे काम सुरू आहे. त्याच प्रकारे ज्या भागातील तक्रार प्राप्त होत आहे तेथील झाकणे देखील बदलण्यात येत आहेत.

– यतीन जाधव, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग