भाजीच्या निमित्ताने अमली पदार्थ विक्रीत ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग?

कल्याण, डोंबिवली तसेच २७ गावांच्या हद्दीत नऊ ठिकाणी राजरोसपणे अमली पदार्थांची विक्री करण्यात येत असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी अमली पदार्थ एका टोपलीत घेऊन त्यावर मेथी, पालक, कोथिंबीर जुडी ठेऊन अमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली.

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील ढाबे, बिअर-बारमधील नियमीत येणाऱ्या काही ग्राहकांना हेरुन अंमली पदार्थ विक्रीचा धंदा या भागात पाय पसरु लागल्याचे चित्र आहे. शिळफाटा रस्त्यावरील टाटा पॉवर समोरील झोपडपट्टी, चक्कीनाका येथील झोपडपट्टीत अंमली पदार्थ विक्रीचे तीन अड्डे आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. याच भागात असलेल्या पिसवली प्रवेशद्वाराच्या आतील बाजुला एक वयस्कर महिला भाजीची टोपली घेऊन बसते. आजीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भाजी विक्रेत्या एका टोपलीत भाजी आणि दुसऱ्या टोपलीत किंवा पिशवीत चरस, गांजा विक्रीसाठी ठेवलेला असतो, असे या भागातील प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. नेतिवली (पत्रीपूल) पोलीस चौकीच्या मागे डोंगरावर राजरोस चरस, गांजा विक्री सुरू असते. कचोरे (९० फुटी रस्ता) येथे अमली पदार्थ विक्रीचे दोन थांबे आहेत. कचोरेतील शिवसेना शाखेच्या बाजुच्या गल्लीतून आतमध्ये गेल्यानंतर एका झोपडीत, तसेच कचोऱ्यात शाळेच्या बाजुच्या गल्लीने आतमध्ये गेल्यानंतर एक म्हातारी झोपडीत चरस विक्री करते, अशी माहिती सुत्रांनी दिली. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात पठाण मामू, चांदबी मामी अंमली पदार्थ विक्री करीत असल्याची माहिती एका विश्वसनीय माहितगाराने दिली. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानका जवळ असलेल्या पोलीस चौकीच्या बाहेर बिनधास्तपणे अंमली पदार्थ विक्री सुरू आहे. काटई गावात मंदिराच्या बाजुला रस्त्यावर एक म्हातारी गांजा विक्री करते. तिच्या घरातही अंमली पदार्थाचा साठा असतो, अशी माहिती आहे.

फेरीवाल्यांना हप्ते

अंमली पदार्थ विक्रेते त्या भागातील फेरीवाले, रहिवाशांना पोलिस किंवा अन्य संशयीत व्यक्ति झोपडपट्टी भागात आली तर ती माहिती देण्यासाठी फेरीवाल्यांना दरमहा हप्ते बांधून देतात, अशी माहिती पोलीस यंत्रणेला मिळाली आहे. यातील बरेचसे फेरीवाले झोपडपट्टीत कोठे गांजा विक्री सुरू आहे याची माहिती माहिती असुनही देत नाहीत, अशी व्यवस्था चरस विक्रेत्यांनी केलेली असते. स्थानिक पोलीस ही साखळी मोडून काढण्यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

अंमली पदार्थ विक्री कोठे सुरू आहे. याची नक्की माहिती असेल किंवा कोणीही माहितगाराने ही माहिती दिली तर तात्काळ त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. हे व्यवसाय छुप्या पध्दतीने चालविले जातात. हे व्यवसाय ज्या ठिकाणी चालतात. तेथे कमालीची गुप्तता पाळली जाते किंवा माहिती देण्यासाठी शेजारी पुढे येत नाहीत. त्यामुळे नक्की माहिती असल्या शिवाय थेट कारवाई करता येत नाही.

वरिष्ठ पोलीस अधिकारी गुन्हे शाखा, कल्याण-डोंबिवली