वीजवाहिन्या नूतनीकरणासाठी ठेकेदार मिळेनात
दिव्यातील विजेचा लपंडाव दूर व्हावा यासाठी महावितरणने या पट्टय़ात वीज वितरण व्यवस्थेच्या नूतनीकरणासाठी सुमारे ३७ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. मात्र, भूमिगत वाहिन्या टाकणे तसेच उपकेंद्रांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागेवर स्थानिकांच्या असहकाराला सामोरे जावे लागत असल्याने ही कामे करण्यास एकही ठेकेदार पुढे येत नसल्याची धक्कादायक माहिती उघड होऊ लागली आहे. यासंबंधी महावितरणने नुकत्याच मागविलेल्या निविदेलाही थंड प्रतिसाद मिळाल्याने दिव्याचा अंधार संपणार तरी कधी, असा सवाल उपस्थित होत आहे.
दिव्यात गेल्या काही दिवसांपासून विजेचा सतत लपंडाव सुरू आहे. शुक्रवारपासून खंडित झालेला विजेचा पुरवठा सोमवापर्यंत बंद होता. त्यामुळे दिवावासीय वीज वितरण कंपनीच्या कारभारावर कमालीचे नाराज असले तरी या अव्यवस्थेची मुळे स्थानिकांच्या असहकारात असल्याचे स्पष्ट झाले आहे. जुनाट वीजवाहिन्या, वाकलेले विजेचे खांब, अपुरे जुने ट्रान्सफार्मर, वीज उपकेंद्राच्या जागांवर रहिवाशांचे अतिक्रमण, भूमिगत वाहिन्यांसाठी जागेची कमतरता या सगळ्या अडचणींमुळे दिव्यातील महावितरणच्या यंत्रणेला ग्रहण लागले आहे. त्याचा फटका येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर दिवा परिसरात वारंवार विजेचा पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले होते. दररोज १२ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहिला आहे. महावितरणने वीजवाहिनी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापही काही भागांत वारंवार वीजपुरवठा खंडित आहे. दिव्यातील वीज प्रश्न सोडवण्यात महावितरण हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले होते.

चार महिन्यांत दिव्यातील यंत्रणांचे नूतनीकरण
दिवा शहराला सध्या खिडकाळी व भारत गीअर येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा होत असून ही यंत्रणा अत्यंत अपुरी आहे. त्यासाठी महावितरणने नवे तीन उपकेंद्रे दिवा भागात प्रस्तावित केले आहेत. मेक कंपनी, बेतवडे आणि मॅरेथॉन भागात ही उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. दिव्यात ६० हून अधिक ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात येणार आहेत. वीजवाहिन्या भूमिगत करण्यासोबत संपूर्ण यंत्रणेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढून एका ठेकेदारास कामही देण्यात आले होते. मात्र जागेच्या अडचणींमुळे हे काम थांबले. पुन्हा नव्याने या भागातील कामांसाठी निविदा काढून पुढील चार ते पाच महिन्यांत ही कामे पूर्ण होतील.
– सतीश करपे, मुख्य अभियंता, भांडुप परिमंडळ