जुन्या ठाण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण करण्याच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पास पुन्हा एकदा चालना मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सत्ताधारी शिवसेना आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात झालेल्या मनोमिलनानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रुंदीकरणास हिरवा कंदील दाखविला असून गेल्या वर्षभरापासून सत्ताधाऱ्यांच्या मंजुरीसाठी प्रलंबित राहिलेल्या या ठरावास नुकतीच संमती दाखविण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. हा ठराव मंजूर करून आयुक्तांकडे अंमलबजावणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यामुळे रस्तारुंदीकरणाच्या या ठरावावर जयस्वाल किती वेगाने निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

जुन्या ठाण्यातील अरुंद रस्त्यांमुळे ठाणेकरांपुढे वाहतूक कोंडीचे विघ्न अजूनही कायम आहे. हे दुखणे दूर व्हावे यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी खोपट, राम मारुती रोड, गोखले मार्ग तसेच पाचपाखाडी परिसरातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महापालिका निवडणुकांपूर्वी आखला होता. या संपूर्ण भागातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी फारशी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुकाने तसेच इमारतींसमोरील मोकळ्या जागा (मार्जिनल स्पेस) ताब्यात घेऊ न रुंदीकरणाचा मार्ग प्रशस्त करण्याची महापालिकेची योजना आहे. यासाठी महापालिका अधिनियमातील कलम २१०चा आधार घेण्याचे ठरविण्यात आले होते. तशा स्वरूपाचा प्रस्तावही जयस्वाल यांनी स्थायी समितीपुढे मांडला. मात्र, मूळ शहरातील व्यापारी मतदार दुखावले जातील या भीतीने तत्कालीन स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला.  त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने पुन्हा सत्तेवर येताच जुन्या ठाण्यातील रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी आग्रह धरला होता. यासंबंधीचा एक ठरावही वर्षभरापूर्वी संमत करण्यात आला. या ठरावावर महापौर, सभागृह नेत्यांची स्वाक्षरी होत नाही तोवर अंमलबजावणी करणे शक्य नसल्याने जयस्वाल यांचीही कोंडी झाली होती. मात्र आता ही कोंडी फुटल्याचे दिसत आहे. दरम्यान, यासंदर्भात जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता, ‘जुन्या ठाण्यातील रस्तारुंदीकरणाचा ठराव मला नुकताच प्राप्त झाला असून त्यावर लवकरच अंमलबजावणी केली जाईल,’ असे ते म्हणाले.

भाजप अस्वस्थ

ठाणे शहरातील रस्तारुंदीकरणासाठी हा प्रस्ताव महत्त्वाचा असला तरी राममारुती रोड, गोखले मार्ग अशा महत्त्वाच्या ठिकाणी यापूर्वीच व्यापाऱ्यांच्या जागा संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ‘मार्जिनल स्पेस’चा वापर करणे व्यापाऱ्यांवर अन्यायकारक ठरणार असल्याचे भाजपच्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, शिवसेना-जयस्वाल यांच्या युतीने कोणत्याही परिस्थितीत रस्तारुंदीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने भाजपची अस्वस्थता आणखी वाढल्याचे बोलले जात आहे.