बदलापूरातील रहिवासी हैराण; महावितरणाकडून तथ्य नसल्याचा दावा

वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या पुरवठय़ामुळे बदलापूरकर अक्षरश: हैराण झाले असतानाच सातत्याने होणाऱ्या विद्युत दाबातील अनियमिततेने येथील नागरिकांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून विद्युत दाबात सातत्याने चढ उतार होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे बिघडू लागल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. महावितरणने मात्र यासंबंधीच्या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

महिनाभरापासून बदलापूर परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यासंबंधी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून ठोस उत्तर मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. असे असताना बदलापूर पश्चिमेत काही भागात विद्युत दाबातील अनियमिततेने नागरिकांच्या त्रासात आणखी भर पडली आहे. बदलापूर पश्चिमेतील पाटीलनगर, पोखरकरनगर आणि मांजर्लीच्या काही भागात हा प्रकार वाढला आहे. त्यामुळे या भागातील अनेक घरांतील विद्युत उपकरणांमध्ये बिघाड दिसू लागले आहेत. रात्री दहा ते अकरा विद्युतदाब कमी-अधिक होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे अनेक उपकरणे बिघडून बंद पडली आहेत. रात्रीच्या वेळी थंड हवेसाठी अनेक घरामध्ये वातानुकूलित यंत्र, कूलर वापरले जातात. त्यात ही उपकरणे तुलनेने अधिक महागडी असतात. या उपकरणांसाठी अधिकची वीज लागत असते.  विद्युत दाबातील अनियमिततेचा सर्वाधिक फटका या उपकरणांना बसत असल्याची माहिती रहिवाशांनी दिली.

रात्रीच्या वेळी विद्युत दाबातील अनियमिततेमुळे अचानक वीज कमी जास्त होत असते. त्यामुळे अनेकदा चालू पंखे, टेलिव्हिजन सेट अचानकपणे बंद पडत असल्याचा अनुभव रहिवाशांना घ्यावा लागत आहे. बदलापूर पश्चिमेतील एकत्रित केल्यास विद्युत उपकरणांचे नुकसान काही लाखांच्या घरात असल्याचे सांगण्यात येते. या समस्येवर त्वरित उपाययोजना करून भविष्यातील नुकसान रोखण्याची मागणी आता नागरिक करत आहेत. दरम्यान याबाबत वीज वितरण विभागाच्या अभियंत्यांना विचारले असता, या भागातील ट्रान्सफार्मरमध्ये काही तरी बिघाड झाला असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

विद्युत दाबात चढउतार असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. मात्र भर उन्हाळ्यात काम हाती घेतल्यास नागरिकांना आठ ते दहा तास अधिकच्या भारनियमाला सामोरे जावे लागले, असेही त्यांनी सांगितले. मात्र पर्यायी ट्रान्सफार्मर नसल्याने हे काम रखडले असल्याचे समोर आले आहे.

मंगळवारची रात्रही अंधारात

मंगळवारी रात्री बदलापूर पश्चिमेला विजेचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीत बिघाड झाल्याने रात्री साडेअकरा ते दोन वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला होता. गेले काही दिवस सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठय़ामुळे रहिवाशी हैराण झाले असून महावितरणच्या अधिकाऱ्यांना उत्तर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून यामुळे अनेकदा आमच्या सोसायटीतील अनेकांची विद्युत उपकरणे बिघडली आहेत. याबाबत आम्ही वीज वितरण विभागाकडे तक्रार केली असून अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. कारणे सांगून अभियंते वेळ काढत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती आहे.

 – गोविंद कुंभार, नागरिक.