राष्ट्रीय जनगणना २०१०-११ अभियानातील दोन टप्प्यांमध्ये पार पडलेल्या जनगणनेच्या कामातील दुसऱ्या टप्प्यातील नऊ हजार पाचशे रुपयांचे मानधन सुमारे तीन हजार शिक्षकांना चार वर्षे उलटूनही अद्याप मिळालेले नाही.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतर्फे जिल्हा परिषद, नगरपालिका, प्राथमिक व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये अशा विविध शाळा-महाविद्यालयांतील सुमारे पाच हजार शिक्षकांवर जनगणना अभियानाचे काम सोपवण्यात आले होते. हे काम दोन टप्प्यांत पार पडले. पहिल्या टप्प्यातील मानधन रुपये नऊ हजार सर्व पाच हजार शिक्षकांना मिळाले. परंतु दुसऱ्या टप्प्यात कबूल झालेले नऊ हजार पाचशे रुपयांचे मानधन कल्याण पूर्व भागातील ‘ड’ प्रभागाच्या सुमारे तीन हजार शिक्षक आणि डोंबिवलीमधील ‘ह’ आणि ‘ग’ प्रभागातील शिक्षकांना अद्याप मिळालेले नाही. पाच हजार शिक्षकांपैकी कल्याण ग्रामीण भागातील शिक्षकांना मानधन मिळाले तरी मानधनापासून वंचित का ठेवण्यात आले आहे, असा प्रश्न शिक्षक विचारत आहेत. जनगणना मोहिमेत शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांबरोबरच मोठय़ा प्रमाणात नगरपालिकेच्या, खासगी शिक्षकांचा लवाजमा असतो. जनगणना अभियान पार पडल्यानंतर अभियानातील सिंहाचा वाटा असलेल्या शिक्षकांचा शासनाला जाणीवपूर्वक विसर पडतो. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्यामार्फत  वारंवार पत्रव्यवहार करूनही उत्तर न मिळाल्याने शिक्षक मंडळी हतबल झाली आहेत. आगामी क.डों.म.पा. निवडणुकीतही मानधनाचे गाजर दाखवण्यात येईल, परंतु अखेर शिक्षकांच्या नशिबी निराशाच येणार आहे.
सूर्यकांत तेलंगे, कल्याण