रविवारी निर्मळ येथे पहिल्या सभेद्वारे आंदोलनाचा बिगूल वाजणार

टँकर लॉबी आणि भूमाफियांच्या विरोधात एकेकाळी हरित वसईने ऐतिहासिक लढा उभारला होता. आता वसईचा विविध मार्गाने होणारा ऱ्हास थांबवून वसईला वाचविण्यासाठी पर्यावरण संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली आहे. येत्या रविवारी निर्मळ येथे पहिल्या सभेद्वारे आंदोलनाचा बिगूल वाजवला जाणार आहे.

वाढत्या वसई विरार शहरात विविध मार्गाने धोका निर्माण झालेला आहे. खारपट जमिनीवरील अतिक्रमणाने गावाला वेढा घातला आहे. भराव टाकून हजारो अनधिकृत बिल्डिंग उभ्या राहत आहेत. शेकडो अनधिकृत चाळी, कोलंबी प्रकल्प सुरू आहेत. गावाचा सर्व बाजूंनी नैसर्गिक पाण्याचा स्रोत बंद झालेला आहे.

पावसाळ्यात पूरसदृश परिस्थिती तर ट्रॅकरद्वारे पाणीउपशामुळे गावातील विहिरी क्षारयुक्त व ओस पडत आहेत. गावाचे गावपण टिकावे, वसईची संस्कृती-समुद्रकिनारे-हिरवळ-निसर्ग टिकावा यासाठी वाघोली येथील काँग्रेसचे तरुण नेते समीर वर्तक यांच्या संकल्पनेतून पर्यावरण संवर्धन समिती स्थापन झाली आहे. या समितीत वसईतील सर्व सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी यांना सामावून घेतले जाणार आहे.

वसई-विरारसाठी सिडकोने बनविलेला विकास आराखडा २००१-२०२१ लवकरच संपुष्टात येऊन २०२१-२०४१ असा नवीन आराखडा बनणार आहे. त्यात २२-२२ माळ्यांच्या इमारती, ५० लाखांहून जास्त लोकवस्ती यांना मान्यता मिळेल. पुढील २० वर्षांत आपली वसई कशी असेल व ती कशी हे जाणून घेण्यासाठी समितीची पहिली सभा रविवार १८ सप्टेंबर रोजी दुपारी निर्मळ येथे होणार आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो आणि नियोजनकार चंद्रशेखर प्रभू उपस्थित राहणार आहेत.

वसईची संस्कृती, स्थानिकत्व जपण्यासाठी, निर्भय समाजासाठी व वसईचे नैसर्गिक वैभव टिकविण्यासाठी सर्वानी या समितीत सहभागी व्हावे, असे आवाहन या समितीचे निमंत्रक समीर वर्तक यांनी केले आहे.