किरण शांताराम यांचे प्रतिपादन
‘चित्रपट कसा पाहावा.. त्यातील बारकावे अभ्यासावे.. आणि त्यातून रसग्रहण करावे.. आजच्या तरुणांनी चित्रपट अशा पद्धतीने पाहण्याची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी सुजाण प्रेक्षक म्हणून चित्रपटाचा आस्वाद घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन किरण शांताराम यांनी ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील कार्यक्रमात केले.
चित्रपती व्ही. शांताराम यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाला सलाम करण्यासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या फिल्म सोसायटीच्यावतीने व्ही. शांताराम चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या पाणिनी सभागृहात या महोत्सवाचे उद्घाटन व्ही. शांताराम फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी बोलताना किरण शांताराम म्हणाले, ‘‘चित्रपट कसा पाहावा, त्यातील बारकाव कसे अभ्यासावे यासाठी पुण्यातील फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे चित्रपटातील रसास्वाद या शिबिराचे आयोजन करते. त्यामध्ये प्रेक्षकांची अभिरुची वाढवण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. आजच्या तरुण पिढीने सुजाण प्रेक्षक म्हणून चित्रपटाचा आस्वाद घ्यावा. त्यातून चांगल्या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळू शकेल.’’
व्ही. शांताराम यांच्यावर आधारित ‘शांतारामा’ या चरित्राचे दिलीप प्रभावळकर यांनी अभिवाचन केलेली सीडी उपलब्ध आहे. मराठी चित्रपटांची संदर्भसूची उपलब्ध आहे. ज्यात चित्रपटसृष्टीच्या शंभर वर्षांच्या काळातील चित्रपटांचा इतिहास, निर्मिती यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. या सर्वाचा लाभ विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासासाठी करावा असे आवाहन त्यांनी केले. व्ही. शांताराम यांच्या आठवणींना उजाळा देत महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी मराठी भाषेतून ‘चित्रपट रसास्वाद’ कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी या वेळी महाविद्यालयाच्या फिल्म सोसायटीच्या कार्यक्रमांचा आढावा घेतला. या महोत्सवात विद्यार्थ्यांना रामजोशी (१९४७), अमरभूपाळी (१९५१), दो आंखे बारह हाथ (१९५७), पिंजरा (१९७८) हे व्ही. शांताराम यांचे चार चित्रपट दाखवण्यात आले.
महाविद्यालयातर्फे भारतीय चित्रपट विषयाच्या संदर्भात राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पूर्व कार्यक्रम म्हणून हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता, असे कार्यक्रमाचे कार्यवाह प्रा. महेश पाटील यांनी सांगितले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुभाष शिंदे, ग्रंथपाल नारायण बारसे, प्रा. स्मिता भिडे, प्रा. दीपक मुर्डेश्वर, प्रा. विमुक्ता राजे, प्रा. संगीता दास यांच्या सहकार्याने हा महोत्सव पार पडला.

राष्ट्रीय सामाजिक ऐक्य पंधरवडा
ठाणे : राष्ट्रीय एकात्मता व सलोखा निर्माण व्हावा व विविधतेने नटलेल्या या देशात सर्वत्र शांताता प्रस्थापित व्हावी, यासाठी राष्ट्रीय सामाजिक ऐक्य पंधरवडय़ाची आता गरज निर्माण झाली आहे. असे मत बांदोडकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक प्रा. प्रकाश माळी यांनी व्यक्त केले. विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंती दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते.
या पंधरवडय़ामध्ये महाविद्यालय परिसरात व पटांगणात सद्भावना प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला आणि वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सद्भावना गीत सादर केले व महाविद्यालयीन परिसरात एका भव्य मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या पंधरवडय़ामध्ये महाविद्यालय सांस्कृतिक विभाग, जागर जाणिवांचा अभियान, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रा. अनिल आठवले, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. बिपिन धुमाळे व एनसीसीचे कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण पारिया उपस्थित होते.

महाविद्यालयात महिला सक्षमीकरण विभाग
अंबरनाथ : अंबरनाथमधील एसआयईएस महाविद्यालयात महिला सक्षमीकरण विभागाची स्थापना करण्यात आली असून याचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पाडला आहे. या विभागाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रसिद्ध निवेदिका दीपाली केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण पाटील उपस्थित होते. ‘युवतींनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून स्वत:चे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. पुरुषांचीही मानसिकता बदलणे गरजेचे असून यामुळे समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबू शकतील, असे केळकर म्हणाल्या. या वेळी महाविद्यालयीन स्पर्धामध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

वक्तृत्व स्पर्धात बांदोडकरच्या विद्यार्थ्यांचे यश
ठाणे : ठाण्यातील विज्ञान महाविद्यालय असलेल्या वा. ना. बांदोडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी वक्तृत्व स्पर्धामध्ये मोठय़ा प्रमाणात सहभाग घेत असून त्यामध्ये सुयश संपादन करत आहे. मुंबईतील प्रबोधन आणि मुलुंडमध्ये आयोजित अत्रे वक्तृत्व स्पर्धेत बांदोडकरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत विजेतेपद प्राप्त केला आहे. मुंबईच्या प्रबोधक या संस्थेद्वारे घेण्यात येणाऱ्या महावक्तृत्व स्पर्धेत विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर महाविद्यालयाने अंतिम फेरीत बाजी मारली आहे. महाविद्यालयाच्या अक्षय पाटील, दर्शना पाटील, हर्षांली दगडे व शिवानी चव्हाण हे विद्यार्थी अंतिम फेरीत दाखल झाले आहेत. तर मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित आचार्य अत्रे वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयाच्या सपना पाटील हिने द्वितीय क्रमांक पटकावला. प्रबोधन संस्थेच्या स्पर्धेचे आयोजन जोशी-बेडेकर महाविद्यालयात पार पडले. त्यातून उपांत्य फेरीत बांदोडकरच्या या विद्यार्थ्यांची निवड झाली. या स्पर्धेची अंतिम फेरी डोंबिवली येथे होणार असून ठाण्याचा महावक्ता कोण, हे ठरणार आहे. वा. ना. बांदोडकर महाविद्यालयातर्फे या स्पर्धेसाठी दहा विद्यार्थी सहभागी झाले होते.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात वर्धापन दिन साजरा
ठाणे : आदर्श विकास मंडळाचा ३१वा वर्धापन दिन सोहळा व संस्थापकीय अध्यक्ष कै. बी. बी. मोरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा आयोगाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती व्हावी या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या नक्षत्र बागेचे उद्घाटन माजी शिक्षणाधिकारी व माजी पोलीस उपायुक्त काशिनाथ कचरे यांच्या हस्ते करण्यात आले. नक्षत्र बाग म्हणजे सत्तावीस नक्षत्रांच्या अनुषंगाने लावलेल्या औषधी वनस्पती, ज्याची आजच्या जागतिक तापमान समस्येच्या काळात गरज आहे आणि त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे मत रोटरी क्लब ऑफ यंग डोंबिवलीच्या अध्यक्षा डॉ. मंगल तिवारी यांनी व्यक्त केले.