महापालिका निवडणुकीसाठी बोगस शिधापत्रिकांचा वापर करून बोगस मतदान करण्याच्या जोरदार हालचाली शहराच्या विविध भागांत सुरू आहेत. शहरात ये-जा करणाऱ्या मोठय़ा वाहनांची तपासणी होत असली तरी बोगस शिधापत्रिकांच्या जोरावर मैदान मारण्याची तयारी काही पक्षांकडून करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी येणाऱ्या मतदाराचे छायाचित्रासह ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही मतदान करू देऊ नये, अशी मागणी विविध पक्षांकडून जोर धरू लागली आहे. महापालिका निवडणुकीतील अनेक मतदारांची नावे या वेळी विविध प्रभागांमध्ये विखुरली आहेत. काही मतदार मृत पावले आहेत तर काही सदनिका सोडून गेले आहेत. त्यांचीही नावे यादीत आहेत. अशा मतदारांच्या नावावर बोगस मतदान करून निवडून येण्याची क्लृप्ती काही उमेदवारांकडून लढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी बोगस शिधापत्रिकांचा वापर होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अशा बोगस शिधापत्रिका तयार करण्याची कामे सुरू असल्याचे समजते. अधिक माहितीसाठी साहाय्यक निवडणूक अधिकारी संजय जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. पोलीस उपायुक्त संजय जाधव यांच्याशीही संपर्क होऊ शकला नाही.