कुठले गाणे कधी ऐकावे याचे काही ठोकताळे आहेत. प्रहरानुसार जशी सुरांची पंगत बदलते तशी खाद्यपदार्थाची. त्यावरूनच कधी काय गावे आणि काय खावे याचे ठोकताळे बनले आहेत. अगदी सकाळी भूक लागली असेल तर नाश्त्याला गरमागरम पोहे, शिरा, उपमा, इडली, डोसा असे पदार्थ खावेसे वाटतात. मात्र दिवस आणि रात्रीच्या मधील तिन्हीसांजेला भूक लागली असेल तर मात्र चटकन गरमागरम समोसा खाण्याची इच्छा कोणत्याही व्यक्तीला होते. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात समोशाने त्या त्या प्रांतानुसार आपले वेश बदलले. आवश्यकता आणि गरज म्हणून समोशाची चव, आकार, बनविण्याची पद्धत बदलत गेली. तेव्हा विविध प्रदेशानुसार, गरजेनुसार, समोशाच्या आकारापासून, त्याची चव, बनवण्याची पद्धत, सारणापर्यंत प्रत्येक गोष्टीत बदल होत गेला. परंतु भारतात सर्वाधिक लोकप्रिय असणारा समोसा म्हणजे पट्टी समोसा.
ठाण्यातील वागळे इस्टेटमधील शांतीनगर परिसरातील जय महाराष्ट्र वडापाव सेंटर हा आपल्या पट्टी समोसा या पदार्थासाठी खूप लोकप्रिय आहे. संध्याकाळच्या वेळी चक्क लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत, शांतीनगरच्या रहिवाशांची पावले जय महाराष्ट्र वडापाव सेंटरच्या दिशेने वळतात. कंपनी बंद झाल्यानंतर, घरात परिस्थिती बिकट असल्यामुळे उदरनिर्वाहासाठी बाळासाहेब काळे यांनी वडापाव सेंटर सुरू केले. सुरुवातीच्या काळात दुकान नव्हते. एक साधा बाकडा होता. मात्र बाळासाहेबांच्या हाताला असलेल्या चवीमुळे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला.
१९८६ मध्ये बाळासाहेबांनी पट्टी समोसा विकण्यास सुरुवात केली. हळूहळू हा पदार्थ लोकप्रिय होत गेला व जय महाराष्ट्र वडापाव सेंटरचा तो सर्वाधिक खप असणारा पदार्थ ठरला. आजही पट्टी समोसा लोक तितक्याच आवडीने खातात याचे कारण म्हणजे या पदार्थाला असणारी चव. नसीम शेख गेल्या २९ वर्षांपासून रोज सकाळी खास पदार्थ बनविण्यासाठी कुर्ला येथून येतात. समोशाचे आवरण हे बारीक मैद्याच्या पट्टीने बनवले जाते. त्यामुळे या पदार्थाचे नाव पट्टी समोसा असे आहे. राई, जिरे, उडीद डाळ, कांदा, कोबी, पोहे, हिरवे वाटाणे, मेथी अचूक प्रमाणात घेऊन त्याला फोडणी देऊन समोशाचे सारण तयार करण्यात येते. समोशासोबत मिळणारी लाल चटणी हीसुद्धा समोशाइतकीच लोकप्रिय आहे. लाल चटणी म्हणजे लाल मिरची, हिरवी मिरची, पुदिना, ओले खोबरे, शेंगदाणे, मिरी, ब्रेड यांचे एक चविष्ट मिश्रणच म्हणावे लागेल.
पट्टी समोसाव्यतिरिक्त वडापाव, पंजाबी समोसा, कांदाभजी, बटाटा भजी, मेथी भजी या खाद्यपदार्थानाही खवय्यांची विशेष पसंती आहे. परिसरातील अनेक नागरिकांबरोबरच काही दर्दी खवय्ये अगदी दूरवरूनही खास आवर्जून येथील पट्टी समोसा खाण्यासाठी येतात. बाळासाहेबांचा मुलगा अविनाश आता दुकानाची जबाबदारी सांभाळतो.

जय महाराष्ट्र सेंटर
शांती वैभव इमारत, भवानी चौक, शांतीनगर, वागळे इस्टेट, ठाणे (प.)