ठेकेदारांकडून वसई-विरार महापालिकेची फसवणूक

कर्मचारी काम करत असल्याचे दाखवायचे आणि या बनावट कर्मचाऱ्यांच्या नावाने त्यांचा पगार आपल्या खात्यात जमा करायचा, असा प्रकार सध्या वसई-विरार महापालिकेत सुरू आहे. ठेकेदार महापालिकेला बनावट कर्मचारी दाखवत असून त्यांच्या नावे आलेला पगार स्वत:च्या खिशात घालत आहेत. त्यामुळे अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या आस्थापनेवरील पदाच्या सुधारित आकृतिबंधानुसार वसई-विरार महानगरपालिकेतील आकृतिबंधापेक्षा जास्त असलेल्या २८५१ ठेका कर्मचाऱ्यांची १ फेब्रुवारी २०१६ पासून महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांच्या आदेशावरून कपात करण्यात आली होती. ज्यांच्याकडे शैक्षणिक अर्हता आहे, अशा कर्मचाऱ्यांना पुढे कामावर ठेवले होते. महापालिकेच्या या निर्णयामुळे पालिकेमधील ठेकेदारांनी ठेवलेल्या बोगस कर्मचाऱ्यांना चाप बसला होता, परंतु या बोगस कर्मचाऱ्यांच्या प्रकाराने पुन्हा डोके वर काढले आहे.

३ जुलै २००९ साली वसई-विरार शहर महापालिका स्थापन झाल्यानंतर पालिकेने विविध विकासकामे आणि प्रशासकीय कामांसाठी ठेकेदार पद्धत अवलंबली होती. त्यानुसार पालिकेतील ठेकेदारांच्या हाताखाली कर्मचारी काम करण्यास ठेवले असून ठेकेदाराच्या यादीनुसार त्यांच्या नावे पगार निघत आहेत, परंतु या ठेकेदारांच्या या यादीमध्ये निम्मे कर्मचारी बोगस असल्याचे उघडकीस आले आहे. एखादा व्यक्ती महापालिकेत नोकरीस लागला असता त्याने सोबत अजून आपल्या नात्यातील दोन जणांचे खाते क्रमांक आपल्या सोबत घेऊन येणे हा पालिका ठेकेदारांचा नियमच आहे. त्यानंतर या आणलेल्या खात्यात त्या बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे गेल्या दीड वर्षांपासून पगार निघत असून तो पगार त्यांच्या बँकेच्या खात्यात सरळ जमा होत आहे. पगार जमा झाल्यानंतर तो पगार पालिकेत नोकरीला असलेल्या नातेवाईकांद्वारे पालिका ठेकेदारांपर्यंत पोचवायचा असा प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे, तसेच पालिकेमध्ये नोकरीस लावतो, असे आमिष दाखवून ठेकेदार हा प्रकार गेल्या दीड वर्षांंपासून करून घेत आहेत, असे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

कर्मचाऱ्यांना ठेकेदारांनी अशा प्रकारचा त्रास दिला ही खरी गोष्ट आहे. त्यामुळे याची शहानिशा करून पूर्वीची पद्धत बंद करण्यात आली आहे. आता या जानेवारी महिन्यापासून नवीन निविादा काढण्यात आले आहेत. त्यासंदर्भातील आदेशही देण्यात आले आहेत. त्यानुसार फक्त पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील.  – सतीश लोखंडे, महापालिका आयुक्त