ठाणे : दिवा येथील दातिवली तलाव परिसरात असलेल्या एका मिठाईच्या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
दिव्यातील दातिवली तलाव परिसरात प्रेम स्वीट मार्ट हे मिठाईचे दुकान आहे. या दुकानाला मंगळवारी मध्यरात्री २.३० वाजता भीषण आग लागली. या घटनेबाबत स्थानिकांकडून अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली नव्हती. या घटनेच्या अध्र्या तासानंतर एका स्थानिकाने अग्निशमन दलाला या आगीबाबत माहिती दिली आणि त्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. या आगीत दुकान जळून खाक झाले आहे. दिव्यातील रस्ते खराब असल्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी पोहचण्यास उशीर झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. स्थानिकांकडे अग्निशमन दलाचा संपर्क क्रमांक नसल्यामुळे काही राजकीय पुढाऱ्यांकडून या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना ३५ मिनिटांनंतर मिळाली.
तोपर्यंत ही आग बाजूच्या दुकानांपर्यंत पोहली. त्यामुळे या दुकानांचेही काही प्रमाणात नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. तसेच अशा घटनांची माहिती १८००२२२१०८ या क्रमांकावर देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 15, 2020 12:19 am