दरवर्षीच्या तुलनेत यंदा मोठय़ा संख्येने आगमन; फ्लेमिंगोच्या थव्यांमुळे पाण्यावर शुभ्र-गुलाबी चादर

बेसुमार रेतीउपसा, खारफुटींची कत्तल, पाण्यावरील भराव अशा विविध कारणांमुळे निस्तेज होत चाललेला ठाणे खाडीकिनारा गेल्या काही दिवसांपासून परदेशी पाहुण्यांच्या किलबिलाटाने बहरून गेला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या मध्यापासून खाडीकिनारी परदेशी पक्ष्यांचे थवेच्या थवे दाखल होऊ लागले असून त्यामुळे या संपूर्ण परिसरात चैतन्य संचारले आहे. पंखांवर लालसर छटा असलेल्या पांढऱ्या रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांच्या थव्यांमुळे तर खाडीच्या पाण्यावर कुणी शुभ्र-गुलाबी चादर अंथरल्याचा भास होत आहे.

थंडीची चाहूल लागताच दरवर्षी ठाणे शहरालगतच्या खाडीकिनाऱ्यावर पक्ष्यांचे थवे जमू लागतात. परदेशातून येणारे रंगीबेरंगी पक्षी आणि फ्लेमिंगोच्या वास्तव्यामुळे पक्षीमय वातावरण छायाचित्रकार आणि पर्यावरणप्रेमींसाठी निसर्गाचा आनंद लुटण्याची जणू पर्वणीच घेऊन येते. साधारणपणे नोव्हेंबर महिना सुरू होताच युरोप, लडाख या ठिकाणाहून पक्ष्यांचे आगमन सुरू होत असते. डिसेंबर महिना खाडीकिनारा या पक्ष्यांच्या हजेरीने अधिक देखणा भासतो. यंदा मात्र नोव्हेंबर महिन्याच्या मध्यावर पक्ष्यांची वाढती संख्या पाहून पक्षीप्रेमी सुखावले आहेत.

खाडीकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांमुळे ठाणे खाडीला ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ जाहीर करण्यात आले आहे. युरोपात मोठय़ा प्रमाणात थंडी सुरू झाल्यावर हे पक्षी ठाणे खाडी परिसराला काही काळ आपलेसे करतात. खाद्याच्या शोधात हजारो किमीपर्यंतचा प्रवास करीत परदेशी पाहुणे ठाणे खाडी परिसराची शोभा वाढवतात. फेब्रुवारी ते मार्च महिन्याच्या अखेरीस हे पक्षी परतीच्या प्रवासास सुरुवात करतात. या वर्षीदेखील पक्ष्यांच्या आगमनाला सुरुवात झाली असून सध्या चार ते पाच हजार फ्लेमिंगो पक्ष्यांनी गर्दी केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने हा आकडा अधिक असल्याचा दावा काही पक्षीप्रेमी करू लागले आहेत.

या रंगीबेरंगी पक्ष्यांना आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी ठाणेकर नागरिक, छायाचित्रकार गर्दी करीत आहेत. या पक्ष्यांपैकी पॅसिफिक गोल्डन फ्लॉवर हा पक्षी खाडीकिनारी तुरळक दिसत असल्याचे छायाचित्रकारांचे निरीक्षण आहे. २०१४ साली ठाणे खाडीकिनारी दोन पॅसिफिक गोल्डन फ्लॉवर पक्षी दिसले होते. २०१५ साली एक पॅसिफिक गोल्डन फ्लॉवर पक्षी निरीक्षणात आला. यंदा अद्याप पॅसिफिक गोल्डन फ्लॉवर पक्षी दिसला नसल्याचे छायाचित्रकारांनी  सांगितले.

ग्रेटेड स्पॉटेड इगलचे प्रजनन

गेल्या वर्षी ग्रेटेड स्पॉटेड इगल हे पक्षी खाडी परिसरात पाहायला मिळाले होते. यंदा या पक्ष्यांची पिल्ले छायाचित्रकारांच्या निदर्शनास आली. यानुसार ठाणे खाडी परिसरात ग्रेटेड स्पॉटेड इगलचे प्रजनन होत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

कुण्या गावाचं आलं पाखरू..

  • गेट्रर फ्लेमिंगोचे नोव्हंेबरच्या सुरुवातीपासून आगमन
  • ब्लॅक टेल गोलविट्स (काळय़ा शेपटीचा पंकज) हा पक्षी लडाख, युरोप आणि कच्छ भागातून येथे दाखल झाला आहे.
  • लेसरविसलिंग डक, कॉमन टिल डक, नॉर्थन शॉवलर, स्पॉट बिल्ड डक या बदकांच्या प्रजातीही येथे दिसत आहेत.
  • युगलिन गल्फ, सँड पायपर्स, सँड ब्लॉवर्स, पायर्ड अ‍ॅवोकेट, रेडशँक, विस्पर्ड टर्न्‍स यांसारखे पक्षी युरोपातून दाखल झाले आहेत.

नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या काळात ठाणे खाडीकिनारी परदेशी पक्ष्यांची गर्दी होत असल्याने पक्षी निरीक्षण करणाऱ्या पक्षीप्रेमींसाठी हा काळ उत्तम असतो. खाडीकिनारी असणाऱ्या धुक्यामुळे या ठिकाणी पक्ष्यांचे छायाचित्रण करणे कठीण जात असले तरी वेगवेगळे पक्षी पाहण्याचा आनंद या ठिकाणी अनुभवता येतो.

डॉ. सुधीर गायकवाडइनामदार, छायाचित्रकार