पाणवठय़ातील गाळ, दगड हटवल्याने प्राण्यांच्या तहानेची सोय; वनविभागाच्या मोहिमेमुळे जीवसृष्टीलाही बहर
येऊर जंगलात असणाऱ्या पाणवठय़ांना स्वच्छ करण्याची जोरदार मोहीम सध्या वनविभागामार्फत सुरू करण्यात आली असून उन्हाच्या झळा वाढत असताना जंगलातील प्राण्यांना नैसर्गिक पाण्याचे स्रोत उपलब्ध व्हावेत यासाठी पूर्वी खोदण्यात आलेले पाणवठे आता पाषाणमुक्त केले जात आहेत. निसर्गमित्र मितेश पांचाळ यांच्या सहकार्याने येऊरच्या जंगल परिसरातील पाणवठय़ांमधील गाळ स्वच्छ करून जंगलातील प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे काम वनविभागामार्फत केले जात आहे. फेब्रुवारी महिन्यात सुरू केलेल्या या पाणवठे स्वच्छ मोहिमेमुळे येऊरच्या जंगलातील जैवविविधता मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचा दावा निसर्गमित्रांनी केला आहे.
येऊर वन परिक्षेत्रात पंचवीस नैसर्गिक पाणवठे आहेत. पावसाळ्यात येथील पाणवठय़ात मुबलक प्रमाणात पाणी साचत असल्याने जंगलातील प्राण्यांना पाणी पिण्यासाठी या पाणवठय़ांचा उपयोग होतो. उन्हाळ्यात मात्र पाणवठय़ातील पाणी आटत असल्याने पाणवठे कोरडे होऊन त्यावर दगड, मातीचा गाळ साचतो. यामुळे येऊर जंगल परिसरात पाण्याच्या कमतरतेमुळे प्राण्यांचा अधिवास कमी जाणवतो. या परिस्थितीवर तोडगा शोधावा अशी मागणी प्राणिमित्रांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. यावर्षी जंगलात जैवविविधतेसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी वनविभागातर्फे एकूण वीस पाणवठे पाषाणमुक्त करण्यात आले आहेत. पाणी नसल्यामुळे कोरडय़ा झालेल्या पाणवठय़ाला स्वच्छ केल्यावर काही ठिकाणी चक्क पाझर फुटला आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात येऊरच्या जंगलात प्राण्यांसाठी नैसर्गिक पाणवठे उपलब्ध होऊ लागले आहेत. येऊर जंगलातील पाणवठे स्वच्छ मोहिमेमुळे बिबटय़ा, सांबर, भेकर, चितळ यांसारख्या प्राण्यांचे अस्तित्वही आता पाणवठय़ाच्या ठिकाणी वाढल्याचे त्यांच्या पावलांच्या ठशांवरून निदर्शनास येत आहे.
पाणवठे स्वच्छ करण्याची पद्धत
वनविभागाचे कर्मचारी आणि निसर्गमित्र यांच्याकडून जंगलातील पाणवठय़ांची जागा शोधून काढली जाते. या पाणवठय़ांच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन स्वच्छ केल्यावर पाझर फुटण्यास ग्राह्य़ धरले गेलेले पाणवठे दगड, माती यांपासून विलग करण्यात येतात. स्वच्छ केलेल्या पाणवठय़ांमध्ये साधारण दोन दिवसांनी पाणी उपलब्ध होते. गेल्या दोन महिन्यांपासून स्वच्छ केलेल्या पाणवठय़ांवर पाणी उपलब्ध झाल्याने मोठय़ा प्राण्यांसोबत मोर, उदमांजर, रानकोंबडी, खार, माकड, काळमांजर, रानडुक्कर यांसारख्या प्राण्यांचे मोठय़ा प्रमाणात अस्तित्व या भागात आढळत आहे. पाणवठय़ावर येणारे सांबर कळपाने येत असल्याने पाण्यात उतरून हे प्राणी पाणी पितात. यामुळे पाणवठा जमिनीतील मातीचा गाळ पुन्हा पाण्यात मिसळून पाणी दूषित होते. दर पंधरा दिवसांनी वनविभागाचे कर्मचारी पाणवठय़ांना भेट देऊन गाळ स्वच्छ करतात.

मानवी हद्दीत प्राण्यांनी प्रवेश करण्याचे मुख्य कारण पाणी आहे. मात्र जंगलातच पाणवठय़ांच्या माध्यमातून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले तर पाण्यासाठी लांब प्रवास करुन मानवी हद्दीत प्राण्यांचे येणे थांबेल. वनविभागाच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पावसाळा सुरू होईपर्यंत पाणवठे स्वच्छ करण्याचे काम सुरु आहे.
– मितेश पांचाळ, निसर्गमित्र

येऊरचे जंगल नैसर्गिक वैभव आहे. अनेक पाणवठे येऊर जंगल परिसरात उपलब्ध आहेत ज्याचा उपयोग प्राण्यांना पाण्यासाठी होतो. उन्हाळ्यात हे पाणी सुकते किंवा त्यात गाळ जमा होत असल्याने पाणवठे दूषित होतात.वनविभागातर्फे दरवर्षी हे काम केले जाते.
– संजय वाघमोडे, परिक्षेत्र वनाधिकारी