कुपोषणग्रस्त मोखाडा परिसरात अन्नधान्याचे वाटप करणार; ४० मंडळांचा सहभाग

गणेशोत्सवादरम्यान नानाविध पुजा होतात. यादरम्यान अनेक गणेश मंडळ अन्नदान, भंडाऱ्याचे कार्यक्रम आयोजित करतात. मात्र या भंडाऱ्यात वापरल्या जाणाऱ्या अन्नधान्याचा उपयोग कुपोषणग्रस्तांना देण्याचा मानस आखताना अंबरनाथ शहरातील शिवसेनच्या वतीने अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. तसेच या उपक्रमात शहरातील अन्य मंडळांनीही सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या काही महिन्यांत मोखाडा आणि पालघर भागात आदिवासी बालकांचे कुपोषणामुळे मृत्यू होत असल्याच्या घटना ताज्या आहेत. गेल्या दोन महिन्यात पालघर जिल्ह्य़ातील मोखाडा तालुक्यात १३ बालकांचे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेजारच्या तालुक्यात भूकेपोटी लहान बालकांचे मृत्यू होत असताना मानवी जीव वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे सामाजिक भान ठेवताना शहरातील सार्वजनिक मंडळांनी भंडाऱ्यासाठी एकत्रित होणारे धान्य गोळा करुन ते कुपोषणग्रस्त भागांना वाटप करण्याचे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले होते.

अंबरनाथ शहरातल्या सुमारे ५० ते ६० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी जवळपास ३० ते ३५ हजार किलो अन्नधान्य या भंडाऱ्यातून वाटप केले जाते. त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो किलो धान्य कुपोषणग्रस्त भागात देता येणार आहे.

यासाठीच विविध सार्वजनिक गणेश मंडळांना पत्रके पाठवून हा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील उद्योगपती, कारखानदार, व्यापारी वर्ग, सामाजिक संस्था यांच्यासह शहरातील नागरीकांनीही कुपोषित बालकांना अन्नदान अथवा अन्य स्वरुपात मदत करावी आणि सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन या पत्रकातून केले आहे.

शिवसेनेचे काही पदाधिकारी, उद्योजक आणि सहकारी समाजसेवक सध्या मोखाडा भागाचा दौरा करत असून प्रत्यक्ष जिथे गरज आहे, तिथे पोहचण्याचा प्रयत्न यामाध्यमातून केला जात असल्याचे, समोर येत आहे.आतापर्यंत यासाठी ४० मंडळांनी मदतीचा हात दिला असून साधारणत ३५ हजार किलो धान्य यातून प्राप्त होणार  असून लवकरच ते कुपोषणग्रस्त भागात पोहोचवण्याचा प्रयत्न  केला जाणार आहे.

-अरविंद वाळेकर, शहरप्रमुख, शिवसेना