गर्दी टाळण्यासाठी इंटरनेटवरून वेळेची नोंदणी

ठाणे : करोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शहरातील अतिसंक्रमित क्षेत्रातील गणेश मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करण्याच्या  स्पष्ट सुचना महापालिका प्रशासनाने दिल्या असून त्यासाठी महापालिकेकडून गणेशोत्सवापूर्वी नव्याने अतिसंक्रमित क्षेत्राची यादी जाहीर करण्यात येणार आहे. या भागातील नागरिकांना गणेश मूर्तीचे घरीच विसर्जन करावे लागणार आहे.

गणेशोत्सवाच्या काळात करोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक आहे. या पाश्र्वभूमीवर पालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या सूचनेनुसार गणेशोत्सवासाठी नियमावली तयार केली असून त्यामध्ये अतिसंक्रमित क्षेत्रातील गणेश मूर्तीना या क्षेत्राबाहेर विसर्जनास परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या भागातील नागरिकांमुळे शहराच्या अन्य भागात करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून पालिकेने अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. परंतु महापालिकेने जाहीर केलेल्या अनेक अतिसंक्रमित परिसरात रुग्णसंख्या कमी झाली असून येथील नागरिकांना र्निबधातून दिलासा देण्यासाठी पालिकेकडून नव्याने अतिसंक्रमित परिसराची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

गणेश मूर्ती आगमन आणि विसर्जनावेळी जास्तीत जास्त तीनच व्यक्ती असावेत, अशा सूचनाही पालिकेने दिल्या आहेत. असे असले तरी शहरातील घरगुती आणि सार्वजनिक मंडळांचा आकडा मोठा असून एका मूर्तीमागे तीन व्यक्ती येणार असल्याचे ग्राह्य़ धरले तर विसर्जन घाटांवर नागरिकांची मोठी गर्दी होऊ शकते. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गणेश मूर्ती विसर्जन ऑनलॉइन वेळनिश्चिती नोंदणीची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या १४ ऑगस्टपासून ही सुविधा उपलब्ध होणार आहे. मात्र, अतिसंक्रमित क्षेत्रातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर परवानगी देण्यात येणार नसल्याची माहिती पालिकेतर्फे देण्यात आली.

ऑनलाइन सुविधा अशी

नागरिकांना http://www.covidthane.org  या महापालिकेच्या अधिकृत डिजीठाणे डॅशबोर्ड लिंकवर जाऊन  Ganesh Visarjan Booking  हा पर्याय निवडावा लागणार असून त्यामध्ये आपल्या प्रभागातील कृत्रिम तलावांची किंवा मूर्ती स्वीकृती केंद्रांची यादी पाहून त्याद्वारे जवळच्या विसर्जनस्थळावर गणेश मूर्ती विसर्जनासाठी वेळनिश्चिती नोंदणी करावी लागणार आहे. या वेळेत नागरिकांना विसर्जनस्थळावर येऊन मूर्ती विसर्जन करावे लागणार आहे. यामुळे नागरिकांची गर्दी टाळण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.