वसईमध्ये महापालिकेच्या सात विहिरींमध्ये कचरा, मातीभराव; पालिकेचे दुर्लक्ष

पाणीटंचाईच्या काळात विहिरी हा महत्त्वाचा जलस्रोत आहे. मात्र वसईमध्ये महापालिकेच्या मालकीच्या विहिरी नष्ट होत आहेत. प्रभाग समिती ‘आय’च्या अखत्यारीत येत असलेल्या तब्बल सात विहिरी कचरा आणि माती टाकून बुजविण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या विहिरी आहेत का कचराकुंडी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वसई-विरार शहरात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. अशा वेळी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करून ते विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वसई-विरार महापालिकेनेही जलयुक्त शिवार योजनेचा प्रचार सुरू केला आहे. वर्षां जलसंचयन अभियानही शनिवारपासून सुरू होत आहे. एकीकडे पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच खुद्द पालिकेच्या मालकीच्या जागेतील विहिरीच नष्ट होत असल्याचे समोर आले आहे.

वसईच्या प्रभाग समिती आयच्या हद्दीतील अशा पद्धतीने सात विहिरी नष्ट झाल्या आहेत. या विहिरींमध्ये कचरा, माती टाकण्यात आल्याने त्या निरुपयोगी झाल्या आहेत. पालिकेच्या पेटिट रु ग्णालयाच्या मागे असणाऱ्या विहिरीत तर वपर्यंत माती टाकण्यात आली आहे. विहिरी तसेच नालेसफाई करण्यासाठी पालिका कंत्राट काढते. पण या बुजविलेल्या विहिरी स्वच्छ करण्यात आलेल्या नाहीत.

पालिका पाणी वाचविण्यासाठी कार्यक्रम घेत असून दुसरीकडे या नष्ट होत असलेल्या विहिरींकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने वसईकर जनतेकडून नाराजी व्यक्त होत आहे.