कासारवडवली भागातील एका घरात कीटक नाशक फवारणी (पेस्ट कंट्रोल)नंतर चारवर्षीय बालिकेचा मृत्यू झाला.

ऋत्वी पालशेतकर असे या मुलीचे नाव आहे. किटकनाशक फवारणीनंतर ऋत्वी आणि तिच्या आईला उलट्या सुरू झाल्या. ऋत्वीचा श्वास कोंडू लागला. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान ऋत्वीचा मृत्यू झाला.

कासारवडवली येथील महापालिका मैदान परिसरात ऋत्वी आई-वडिलांसह राहत होती. घरात झुरळ झाल्याने शनिवारी दुपारी फवारणी करण्यात आली. ऋत्वीच्या आईने रविवारी पहाटे घरात डास येऊ लागल्याने घराच्या खिडक्या बंद केल्या. त्यानंतर दोघींनाही उलट्या सुरू झाल्या. ऋत्वीला श्वास घेताना त्रास होऊ लागला. दोघींनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, रविवारी सकाळी ११ वाजता ऋत्वीचा मृत्यू झाला. तिच्या आईची प्रकृती स्थिर असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र फड यांनी दिली.