दागिन्यांनी भरलेली २३६ पाकिटे दरोडेखोरांकडून लंपास

सोने तारण ठेऊन कर्ज देणाऱ्या नालासोपारा येथील एका कंपनीच्या शाखेवर शुक्रवारी सकाळी सशस्त्र दरोडा पडला. यात कार्यालयातील सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली २३६ पाकिटे दरोडेखोरांनी लंपास केली.

ओस्वाल नगरी येथे ‘युनायटेड पेट्रो फायनान्स लिमिटेड’च्या शाखेत हा दरोडा पडला. शुक्रवारी सकाळी १० या प्रकार उघडकीस आला. एका तवेरा गाडीतून सहा बुरखाधारी व्यक्तींनी वित्तकंपनीच्या शाखेत प्रवेश केला. त्यांनी शस्त्राचा धाक दाखवत कर्मचाऱ्यांना दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर कार्यालयातील साहित्य पिशवीत भरले. १२ मिनिटे हा थरार सुरू होता.

दरोडय़ासाठी वापरण्यात आणलेली गाडी विरारच्या मोहक सिटी परिसरात पोलिसांना सापडली आहे. ही गाडी चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तपास सुरू केला आहे. यासाठी विशेष पथक तयार करण्यात आला आहे. दरोडेखोरांचा शोध सुरु असल्याची माहिती वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली.

२०१३ मध्ये सप्टेंबर महिन्यात अशाच प्रकारचा दरोडा नालासोपारा पश्चिमेकडील एक्सीस बँकेवर असाच दरोडा पडला होता.  नऊ वर्षे उलटूनही त्याचा तपास अद्याप लागलेला नाही.