विविध दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांच्या रांगा, पण अर्जाचे गठ्ठे तहसीलदार कार्यालयात पडून
दहावी आणि बारावीचे निकाल लागल्यानंतर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरू असतानाच तहसील आणि प्रांत कार्यालयातील संथ कारभाराचा फटका त्यांना बसत असल्याचे चित्र आहे. महाविद्यालयीन प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असल्याने विद्यार्थ्यांनी दाखल्यांसाठी अर्ज केले. मात्र हे अर्ज तहसीलदार कार्यालयात पडून आहेत. कार्यालयात कर्मचारीत गैरहजर असल्याने अर्जाचे गठ्ठे पडून असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी मात्र दाखले मिळावे यासाठी कार्यालयाबाहेर रांगा लावल्या आहेत, मात्र शासकीय संथ कारभाराचा त्यांना फटका बसत आहे.
महाविद्यालयीन प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला तसेच इतर मागासर्वगीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉनक्रीमी लेअरचा दाखला आवश्यक असतो. हे दाखले तहसीलदार कार्यालयातून दिले जातात. मात्र सध्या अशा अर्जाचे गठ्ठे तहसीलदार कार्यालयात पडले असून विविध कारणांमुळे कार्यवाही रखडली आहे. हे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची दररोज तहसीलदार कार्यालयात गर्दी होत आहेत. या दाखल्यांवर तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमुळे स्वाक्षरी होत नाही आणि दाखले मिळण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
प्रवेश मिळणार तरी कसा?
प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या सीईटी परीक्षेला अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जून आहे. मात्र अद्याप विद्यार्थ्यांना नॉनक्रीमी लेअरचे दाखले मिळालेले नाहीत. ‘‘आम्ही सोमवारपासून चकरा मारतोय. आज गुरुवार आहे. मात्र कधी प्रांताधिकारी तर कधी तहसीलदार नसल्याने स्वाक्षऱ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे आजही दाखले मिळाले नाहीत,’’ असे अर्जदार पालक संजय म्हात्रे यांनी सांगितले. जर शुक्रवारीही दाखले मिळाले नाहीत तर माझ्या मुलाला सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज करावा लागेल, असे त्यांनी सांगितले.
कर्मचारी शिबिरांच्या दावणीला
अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वतीने दाखले शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. या शिबिरासाठी तहसील कार्यालयातील कर्मचारी हजर राहत आहेत. त्याचा परिणाम शासकीय कामावर होत आहे. या शिबिरात विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेतले जातात. पण त्याचे गठ्ठे तहसीलदार कार्यालयात पडून आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दाखले मिळालेले नाहीत. या कालावधीत दाखल्यांच्या कामावर भर दिला गेला पाहिजे, पण उलट कर्मचारी नसतात आणि दाखल्यांचे गठ्ठे पडून राहतात, अशा तक्रारी पालकांनी केल्या आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 16, 2017 3:06 am