पारंपारिक वेशभूषा केलेले नागरिक, ढोलताशांचा गजर, रांगोळीच्या कलाकृती, तरुणाईचा जल्लोष अशा उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी नववर्ष स्वागतयात्रा पार पडली. ठाण्यातील श्रीकौपिनेश्वर मंदिरातून प्रारंभ झालेल्या या स्वागतयात्रेमुळे गोखले पथ, नौपाडा, राम मारुती पथ या ठिकाणी सकाळी उत्साहाचे वातावरण होते. शहरातील मुख्य रस्त्यावरील चौकाच्या ठिकठिकाणी तरुणांनी ढोलताशांची प्रात्यक्षिके सादर केली. लहान मुले आणि महिलांची दिंडी, जलजागृतीचा संदेश देणारे नागरिक, शालेय विद्यार्थ्यांच्या जिम्नॅस्टिक पथकांचा समावेश स्वागतयात्रेतील चित्ररथात होता. या वर्षी भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर स्वागतयात्रेतील चित्ररथात जास्तीत जास्त जलजागृतीच्या संदेशावर भर देण्यात आला होता. तसेच यंदाच्या वर्षी स्वागतयात्रेत ख्रिश्चन, पारसी, आसामी अशा अन्य धर्मियांचाही सहभाग पहायला मिळाला. तरुणांना आकर्षित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सेल्फी विथ स्वागतयात्रा स्पर्धेला तरुणांनी भरभरुन प्रतिसाद दिला.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या स्वागतयात्रेचे यंदाचे पंधरावे वर्ष होते. शुक्रवारी सकाळी तलावपाळीजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर श्रीकौपिनेश्वर मंदिरातून पालखी निघाली. चिंतामणी चौकात पुष्पवृष्टी केल्यावर स्वागतयात्रेत ख्रिश्चन आणि पारसी धर्मीय सहभागी झाले. जल है तो कल है, जल प्रदूषण करु नको, आपलेच जीवन संपवू नको, असे संदेशपर फलक चित्ररथांना लावण्यात आले होते. पर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी रोगराईला नाही थारा असे सांगत स्वच्छतेचा नारा काही चित्ररथांच्या माध्यमातून देण्यात आला. जांभळीनाका, तलावपाळी या ठिकाणी स्वागतयात्रेत चित्ररथ सहभागी झाले. स्वागतयात्रेच्या दरम्यान काढण्यात येणाऱ्या रांगोळीच्या पायघडय़ा, चित्ररथ, तरुणांचे ढोलपथक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी पहायला मिळत होती. संज्ञा, वीरगर्जना, शिवरुद्र, शिवनाद असे ढोलपथक उत्साहात आपली कला सादर करत होते.

नऊवारी, नथ आणि ढोलताशा..
चिमुकल्यांचा लक्षणीय सहभाग
यंदाच्या स्वागतयात्रेमध्ये तरुणांच्या तुलनेत लहान मुलांची संख्या अधिक होती. यावेळी काही चिमुकल्या मंडळींनी चित्ररथावर विविध सामाजिक संदेश असणाऱ्या फलकांच्या माध्यमातुन जनजागृती, तर काहींनी आपल्या विविधतेने नटलेल्या देशाचे चित्र रसिकांसमोर मांडले. त्याचबरोबर काही बच्चेकंपनी प्राण्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले.

प्रशासनाचे चित्ररथ.
ठाण्यातील श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वागत यात्रेमध्ये यंदा ठाणे परिवहन सेवेची बस, स्वच्छता विभागाची घंटा गाडी, अग्निशमन दलाची गाडी इतर चित्ररथांसोबत यात्रेमध्ये सहभागी झाले होते. या सर्व सेवाही आपल्या संस्कृतिचा भाग आहेत, असा संदेश यातून देण्यात आला. परिवहन सेवेच्या बसमध्ये स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेल्या वृद्ध नागरिकांनी प्रवास करित स्वागत यात्रेचा आनंद लुटला.

‘शांताबाई’च्या तालावर अंगणवाडी सेविकांचे नृत्य
नऊवारी साडी, नाकात नथ आणि डोळ्यांवर सनग्लास लावत शांताबाईच्या तालावर थिरकणाऱ्या ‘त्या’ म्हणजे ठाण्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या अंगणवाडी कर्मचारी महिला. आजवर केवळ आंदोलनाच्या मैदानावर एकत्र येणाऱ्या यामहिला यंदा ठाण्यातील स्वागत यात्रेमध्ये बेभान होऊन नाचत होत्या. शांताबाई, आवाज वाढव डिजे, पिंगा यासारख्या गाण्यांवर त्यांनी ताल धरत नृत्य केले.

नारीशक्तीच्या जागरासह नववर्षांचे स्वागत
अंबरनाथ : स्वागतयात्रेतील नियोजनापासून ते थेट संचलनापर्यंतची सर्व जबाबदारी हाताळत अंबरनाथमधील महिलांनी उत्सवाच्या आयोजनात आणि तो यशस्वी पाडण्यात आपणही कमी नसल्याचे सिद्ध केले.
यंदाच्या नववर्ष स्वागतयात्रेत महिलांना विशेष स्थान देण्यात आले होते. देशातील विविध मान्यवर महिलांच्या पेहरावात वावरणाऱ्या महिला सर्वाचे लक्ष वेधून घेत होत्या. पारंपरिक वेशातील महिला लेझीम खेळत होत्या, तर पारंपरिक वेशातील बाइक चालवणाऱ्या महिलाही मोठय़ा प्रमाणात यात्रेत सहभागी झाल्या होत्या.