वसईला जशी समृद्ध निर्सगसंपदा लाभली आहे, तसा पुरातन ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे. त्यामुळेच वसई म्हटले की डोळ्यासमोर येतात ते विस्तीर्ण किनारे, हिरव्यागार बागा, पुरातन समृद्धीची साक्ष देणारे किल्ले, ऐतिहासिक वास्तू, पुरातन मंदिरे, सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप, पोर्तुगीजकालीन चर्च.. हे सर्व वसईचे वैभव आहे आणि ऐश्वर्यही. हा बहारदार निसर्ग वाचविणे आणि ऐतिहासिक समृद्धीचे जतन करणे हे आपल्या सगळ्यांचे कर्तव्य होते. परंतु वाढत्या विकासाच्या नावाखाली, नागरिकीकरणाच्या नावाखाली या ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान होऊ  लागले आहे. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होऊ  लागलेला आहे. शासकीय अनास्था जशी कारणीभूत आहे, तशी नागरिकांची बेफिकीर वृत्तीही त्याला कारणीभूत ठरू लागली आहे.

वसईकर आपल्या ऐतिहासिक वारशाबाबत अभिमानाने सांगत असतात. पण काळाच्या ओघात शासकीय आणि नैतिक मूल्यांच्या ऱ्हासामुळे या ऐतिहासिक आणि पुरातन संस्कृती आणि पाऊलखुणा हळूहळू नष्ट होत आहे, त्याचे पावित्र्य उद्ध्वस्त होत आहे याची कल्पना कुणाला नाही. किल्ल्यांची दुरवस्था होत आहे. पुरातन शिलालेख रस्त्यावर सापडत आहेत. पुरातत्त्व विभागाच्या जाचक नियमांची सातत्याने आडकाठी होत आहे. त्यामुळे हा वारसा नष्ट झाला तर कधीही भरून न येणाऱ्या या ऱ्हासाला आपण जबाबदार राहणार आहोत.

पुरातन शिलालेख भग्नावस्थेत

वसईत आजही अनेक पुरातन वास्तू, मंदिरे जागोजागी उभी आहेत. एकेकाळी शूर्पारक म्हणून प्रसिद्ध असलेली ही भूमी पुरातन शिल्प, शिलालेखांनी समृद्ध होती. परकीय आक्रमणामुळे त्यातील काही मूर्ती तलावात फेकून दिल्या होत्या. त्या आता तलावाचे खोदकाम करताना मिळू लागल्या आहेत. परंतु पुरातत्त्व विभाग याकडे लक्ष देत नसल्याने त्याची हानी होत असून हा इतिहास पुसला जाणार आहे. नक्षीदार मूर्ती व शिल्पपटांनी संपन्न २००हून अधिक मंदिरे होती. काळाच्या ओघात व परकीय आक्रमणात यातील बरीच मंदिरे नष्ट झाली. कालांतराने मंदिरांतील भग्न झालेल्या मूर्तीचे विसर्जन तलावात करण्यात आले होते, नंतरच्या पिढींना तलावात खोदकाम करताना किंवा विहिरींतील गाळ काढताना हा पुरातन ठेवा सापडला गेला. तो पुन्हा बाहेर काढून ठेवण्यात आला. हा बाहेर काढून ठेवलेला अनमोल ठेवा त्यानंतर कायम दुर्लक्षितच राहिला आहे. त्यामुळे अशा कित्येक भग्न मूर्ती, शिल्प व शिलालेख वसई-विरार परिसरात बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला किंवा मंदिराच्या बाजूला अडगळीत पडलेले दिसून येत आहेत. निर्मळ येथील सुळेश्वर मंदिर व सोपारा येथील चक्रेश्वर मंदिर परिसरात अशा असंख्य भग्न मूर्ती व शिलालेख आपल्याला पाहायला मिळत आहेत, तसेच मोडी लिपीत कोरलेल्या शिलालेखांचा काही ठिकाणी चक्क कपडे धुण्यासाठी वापर केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. हा ऐतिहासिक ठेवा आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवण्यासाठी पुरातत्त्व खाते आणि महापालिका यांनी लक्ष देऊन संग्रहालय उभारावे, अशी मागणी वसईतील नागरिकांतून होत आहे. मात्र त्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही.

चिमाजी अप्पा स्मारकाचे पावित्र्य धोक्यात

वसई प्रांताच्या वैभवशाली इतिहासातील एक सोनेरी पान म्हणजे वसईचा रणसंग्राम. या वैभवाचा जिवंत साक्षीदार म्हणजे जंजिरे वसई किल्ला. पण पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष आणि लोकांची अनास्था यामुळे किल्ल्याची दुरवस्था होत आहे. बेभान झालेले दारूअड्डे, कोणत्याही नियमांचे पालन न करता केले जाणारे चित्रीकरण, गर्द झाडीत लपलेले गर्दुल्ले यांमुळे वसईच्या किल्ल्यात येणाऱ्या पर्यटकांना त्रास होत आहे. दर रविवारी व सुट्टीच्या दिवशी रिक्षात व खासगी गाडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणावर येणाऱ्या दारूच्या बाटल्यांनी किल्ल्याची अत्यंत दयनीय अवस्था बनवली आहे. दारूबाजांच्या गाण्याचा धिंगाणा व चाळे करणारी प्रेमीयुगले यामुळे किल्ल्याच्या गौरवशाली इतिहासाचा अवमान होत आहे. ज्या किल्ल्याच्या स्वातंत्र्यासाठी नरवीर चिमाजी अप्पा लढले, त्याच किल्ल्यावर अशा प्रकारे नंगानाच चालू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले आहे.

ऐतिहासिक समाध्या, बौद्ध स्तूप दुर्लक्षित

जी गत किल्ल्यांची, तीच गत ऐतिहासिक स्मृतिस्थळांची. वसई किल्ल्यावरील चिमाजी अप्पांच्या १६ मे १७३९च्या विजयानंतर सन १७३९ ते १७५० या कालखंडात आगाशी येथे श्री भवानी शंकर मंदिराची निर्मिती करण्यात आली. या मंदिराच्या उभारणी चिमाजी अप्पांचे आगाशी-अर्नाळा प्रांताचे सरसुभेदार शंकराजी केशव फडके यांनी केली होती. गेल्या काही वर्षांपर्यंत शंकराजी पंताचा आगाशी फडके वाडाही अस्तित्वात होता. आगाशी नाक्यावरील तलावाजवळील १७व्या शतकात उभारण्यात आलेल्या प्राचीन श्री भवानी शंकर मंदिराच्या आवारातील समाधीस्थाने आहेत. या परिसरात शंकराजी पंत आणि अन्य शिलेदारांची स्मृतिस्थळे १०० वर्षांहून अधिक दुर्लक्षित राहिली आहे.

बावखले नष्ट, समद्रकिनारे विद्रूप

बावखले ही वसईची ओळख आहे. घराच्या शेजारी पाणी साठवून ठेवण्यासाठी केलेला विहिरीसारखा मोठ्ठा खड्डा म्हणजे बावखल. पण आज ही बावखले बुजवली जात आहे. बावखलाला रहाट लावून त्याचे पाणी शेती आणि अन्य कामासाठी वापरले जात होते. बावखलांमुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी कायम राहत होती. पण ही बावखले आज बुजवली जात आहेत. काही ठिकाणची बावखले तर कचराकुंडय़ा बनली आहे. काही महिन्यांपूर्वी वसईत ‘बावखले वाचवा’ ही मोहीम राबविण्यात आली होती. किनारे हे पर्यटकांचे

आकर्षणाचे केंद्र असले तरी पर्यटकांकडूनच त्याची हानी होत आहे.

ऐतिहासिक वारशाची दुरवस्था होत असताना नैसर्गिक स्थळांचा ऱ्हास होत आहे. काळ झपाटय़ाने पुढे सरकत आहे. राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे. अन्यथा या ऐतिहासिक ठेवी नामशेष होऊन तो केवळ पुस्तकात दिसल्याशिवाय राहणार नाही.