गृहवाटिका म्हणजे फक्त झाड लावणे, पाणी घालणे, छाटणी करणे वगैरेपुरती मर्यादित नाही.

गृहवाटिका ही आपल्यासाठी एक कलाकृती असावी. गृहवाटिकेत तुमच्या सर्जनशीलतेला आणि संवेदनशीलतेला खूपच वाव आहे. कुंडीची निवड-तिचा आकार, रंग, झाडाची निवड, कुंडीची आणि झाडांची मांडणी इथे तुमची सर्जनशीलता दिसून येते. आपणच तयार केलेली ही कलाकृती जास्तीत जास्त आकर्षक कशी करता येईल या दृष्टीने विचार व्हायला हवा.

गृहवाटिका ही आपल्यासाठी एक प्रयोगशाळा असावी. गृहवाटिकेत सदैव काहीतरी नवीन घडत असते. जर बी पेरलं असेल तर काही दिवसातच ती बी उगवते म्हणजे तिला पानं फुटलेली दिसतात. त्यावेळी मुद्दाम एखादी बी हळूच उपटून बघावी की जमिनीखाली तिला किती आणि कशी मुळे फुटली आहेत. बी उगवते तेव्हा पहिली दोन पानं दिसू लागतात. या दोन पानांवरूनच कोणतं बी आहे हे आपल्याला हळूहळू ओळखता आलं तर फारच छान. प्रत्येक बीच्या या दोन पानांचा आकार वेगळा असतो. त्याचं निरीक्षण करणं म्हणजे आपोआपच घरातल्या लहान मुलांना ‘निरीक्षण’ हे स्कील शिकवणं आहे. रोजच्या आहारातून आपल्याकडे बऱ्याच बिया जमू शकतात.

उदा. मिरची (लाल मिरचीतल्या बिया), लाल भोपळा (कारण ते बी तयार झालेलं असतं), चवळी, मूग, मटकी, वाटाणा, हरभरा इ. सर्व कडधान्ये, आंबा, पेरू, खरबूज, कलींगड, सीताफळ, पपई इ. फळांच्या बिया वगैरे. या बिया पेरून ते झाड कसं असतं हे आपण घरच्या घरी बघू शकतो.

फांदीपासून झाडं तयार होताना, झाडाला नवीन पानं कुठून कशी येतात, त्यांचा रंग कसा बदलतो इ. सर्व निरीक्षणही खूप आनंददायी आणि गमतीची बाब होऊ शकते.

झाडांच्या फुलांचं निरीक्षण तर खूपच गंमतशीर. सध्या सगळीकडे गुलमोहर फुललाय. गुलमोहराचं फूल जेव्हा फुलतं तेव्हा त्याच्या ५ पाकळ्यातली एक पाकळी पांढरी असून, त्यावर ठिपके असतात आणि इतर चार पाकळ्या एका रंगाच्या असतात.

हळूहळू ही पांढरी पाकळी लाल होऊ लागते आणि इतर पाकळ्यांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करते. अशी प्रत्येक फुलाची काहीतरी खासियत असते.

निसर्गाने भरभरून विविधता ठिकठिकाणी पेरली आहे. त्याचा आस्वाद घेणं आपल्यावर अवलंबून आहे. ही विविधता निर्माण करताना निसर्गाने वापरलेली चतुराई पाहून आपण थक्क होतो. एकच रंग अनेक आकार. उदा. गुलाबी गुलबक्षी आणि गुलाबी गुलाब- जवळ ठेवलेत तर रंग अगदी तोच पण आकारामुळे केवढी विविधता. एकच आकार अनेक रंग- उदा. अनेक रंगाच्या गुलबक्षी, अनेक रंगाचे गुलाब. फुलांचे रंग आणि त्यांच्या आकाराबरोबरच कळ्या, फुले आणि त्यांची झाडावरची रचना ही सर्व विविधता बघणे, निरखून बघणे आणि निसर्गाला सलाम करणे.

फुलांचं निरीक्षण आणखीन मजेशीर असतं. एखाद्या झाडाचं फूल सकाळी उमलतं की संध्याकाळी? हे आपण निरीक्षण करून माहिती करून घेतलं पाहिजे. उदा. जास्वंद सकाळी उमलते, तर गुलबक्षी, मोगरा संध्याकाळी. सकाळी उमलणारी फुले सूर्यमुखी तर संध्याकाळी उमलणारी फुले चंद्रमुखी असंही म्हटलं जातं. जी फुलं झाडावर एकापेक्षा जास्त दिवस रहातात त्यांच्या रंगात पडणारा फरक बघणे गमतीशीर आहे. काही फुलं ज्या क्रियेने उमलतात, तशीच ती मिटतात, उदा. जास्वंद. पण बरीचशी फुलं उमलतात आणि न मिटता झाडावरून गळून पडतात. यातील काही फुलांच्या पाकळ्या गळतात तर काही फुले सबंधच्या सबंध गळून पडतात.

गृहवाटिकेचा असा हळूहळू आस्वाद घ्यायला लागलं की वनस्पतीसृष्टीविषयी आपण हळूहळू शिकू लागतो. अशी वनस्पतीसृष्टीची ओळख झाल्यावर ‘बोटॅनिकल गार्डन’ मधली सफर उपयोगी ठरते. नाही तर बोटॅनिकल गार्डनमध्ये गेल्यावर खूप झाडांची ओळख एकाच दिवशी झाल्यामुळे काहीच लक्षात राहत नाही.

drnandini.bondale@gmail.com