पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. बदलापूर येथे ही घटना घडली आहे. २८ वर्षीय आरोपी पतीने दोरीच्या सहाय्याने गळा आवळून पत्नीची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार सांबरे याने सासू-सासऱ्यांनी व्यवसाय सुरु करण्यासाठी दीड लाख रुपये देण्यात नकार दिल्याने पत्नी कांचनची हत्या केली.

कांचनचे वडील काशिनाथ निरगुडे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तुषार मंगळवारी रात्री पत्नी आणि आपल्या मुलीला घेऊन घरी आला होता. यावेळी त्याने आपल्याला व्यवसाय सुरु करायचा असून त्यासाठी दीड लाख रुपये हवे असल्याचं सांगितलं. तुषारने एक वर्षापूर्वी नोकरी सोडली होती. यानंतर तो ड्रायव्हर म्हणून काम करत होता.

सहाय्यक पोलीस निरीक्षक गावीत यांनी सांगितल्यानुसार, आरोपीने ३ डिसेंबर रोजी फोन करुन पत्नीने गळफास लावून आत्महत्या केली असल्याची माहिती दिली. “त्याने पत्नी तणावात होती असं सांगितलं. पण शवनिच्छेदन केलं असता गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. याचवेळी कांचनच्या कुटुंबीयांना तुषारसोबत झालेल्या भांडणाची माहिती दिली,” असं त्यांनी सांगितलं आहे.

चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपल्याला मदत न केल्यामुळे पत्नीच्या कुटुंबीयांना धडा शिकवण्यासाठीच आपण हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.