मराठमोळे शहर म्हणून मिरवणाऱ्या डोंबिवली येथे एक महिनाभर इडली महोत्सवाच्या अनुषंगाने दहा प्रकारच्या विविध दाक्षिणात्य इडल्यांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे. खाद्य महोत्सवात कांचीपुरम इडली, रवा इडली, व्हेजिटेबल इडली, स्टफ मसाला इडली, दही इडली,   नी मिनी इडली, इडली फ्राय, इडली पुडी, स्वीट इडली आणि ड्राय-फुट्र इडलीचा समावेश आहे.
तमिळनाडूमधील कांचीपुरम येथील वरदराज पेरूमल म्हणजेच बालाजीच्या देवळात कांचीपुरम इडली नैवेद्य म्हणून दाखविण्यात येते. कांचीपुरम इडली काळी मिरी, सुंठ, आले यांच्या मिश्रणातून तयार होते. इडली चवीला तिखट असल्याने खवय्ये आनंदाने या इडलीचा आस्वाद घेतात. त्याचप्रमाणे या महोत्सवात उपवासासाठी खास अशा रवा इडलीचाही समावेश आहे. रवा आणि दही यांच्या मिश्रणातून रवा इडली तयार होते. या इडलीमध्ये तांदूळ आणि उडीद डाळीचा समावेश नसल्याने ही इडली दाक्षिणात्य खवय्यांसाठी उपवासाच्या दृष्टीने अनुकूल आहे. त्यामुळेच रवा इडली ‘उपवासाची इडली’ या नावानेही ओळखली जाते. रवा इडली चवीला उपम्यासारखी लागते. मुळातच बहुतांशी इडल्यांमध्ये तेलाचा वापर होत नसल्याने इडली हा पदार्थ आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे, असे इडली महोत्सव भरविणारे एस. विश्वनाथन सांगतात.
विविध पोषक घटकांनी समाविष्ट असणारी व्हेजिटेबल इडलीही या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. गाजर, फरसबी, वाटाणा, कोबी या व अशा विविध भाज्यांचे सारण या इडलीमध्ये भरण्यात येते. त्याचप्रमाणे स्टफ मसाला इडलीही महोत्सवात खवय्यांना चाखावयास मिळणार आहे. बटाटय़ाच्या भाजीचे सारण या इडलीमध्ये भरले जाते आणि नंतर ही इडली वाफवून खवय्यांना खाण्यासाठी पेश करण्यात येते. लहान प्रकारच्या इडल्या (मिनी इडली) दही, नारळ, मिरची यांच्या थंडगार मिश्रणात सोडल्या जातात. अशी या इडली प्रकाराला दही इडली असे म्हटले जाते. दही इडली पचनास उपयुक्त ठरणारी आहे. शुद्ध तुपाच्या आणि सांबाराच्या धारेत सजविलेली नी (शुद्ध तूप) मिनी इडलीही येथे मिळणार आहे.
तपकिरी आणि सोनेरी रंग धारण केलेली फ्राय इडलीही महोत्सवात पाहायला मिळणार आहे. मिनी इडली तेलात तळली जाते, म्हणूनच याला फ्राय इडली असे म्हटले जाते. रंगाने लाल पण चवीने झणझणीत अशी इडली पुडीही या महोत्सवात पाहायला मिळणार आहे. या इडलीला गन पावडर म्हणूनही ओळखले जाते. चणा डाळ, उडीद डाळ, तूर डाळ अशा डाळींच्या मिश्रणातून आणि तीळ, हिंग, लाल मिरची यांच्या सहभागातून कोरडी चटणी तयार करण्यात येते आणि ती इडलीला लावण्यात येते. अशी ही इडली पुडी लांब पल्ल्याच्या प्रवासातही प्रवाशांना साथ देते. इडली पुडीबरोबर सांबार, चटणी वेगळी चवीला घेण्याची आवश्यकता नाही. इडलीमध्ये पुरणाचे सारण भरून इडलीला गोड चव प्राप्त करून देणारी स्वीट इडलीही महोत्सवात उपलब्ध आहे. बदाम, काजू, किसमिस, खजूर या सगळ्यांचा समावेश असलेली ड्रायफुट्र इडलीही खवय्यांसाठी उपलब्ध आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्यांबरोबरच ‘वडा करी’ हा पदार्थही या खाद्य महोत्सवाचे वैशिष्टय़ आहे. डाळ वडय़ाचे तुकडे आणि सर्व डाळींचे मिश्रण यातून तयार झालेली वडा करीही खवय्यांसाठी आकर्षण ठरणार आहे.
डोंबिवली पूर्व परिसरात ए-२, पहिला मजला, श्री सिद्धी आर्केड, पूजा-मधुबन टॉकीजसमोर सिथाराम स्नॅक्स सेंटर येथे हा महोत्सव भरविण्यात आला आहे. सध्या हा महोत्सव सुरू असून जुलै महिना अखेपर्यंत सकाळी ८.३० ते दुपारी १.३० आणि सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत महोत्सव सुरू राहणार आहे.

* कुठे : सिथाराम स्नॅक्स सेंटर, श्री सिद्धी आर्केड,
पूजा-मधुबन टॉकीजसमोर, डोंबिवली (पू.)
* कधी : ३१ जुलैपर्यंत
वेळ : सकाळी ८.३० ते
दुपारी १.३० आणि
सायंकाळी ५ ते रात्री १०