कल्याण (पूर्व) भागातील काटेमानिवली, गणपती मंदिर, म्हसोबा चौक ते पोटे इमारतीपर्यंत चाळीस फूट रुंदीचा विकास आराखडय़ातील रस्ता, तसेच म्हसोबा चौक ते तीसगाव नाक्यापर्यंतचा पन्नास फूट रुंदीचा रस्ता बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडला आहे.
 या दोन्ही रस्त्यांवरील अतिक्रमणे अनधिकृत बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी तोडली नाहीत. त्यामुळे नेहमी वर्दळ असलेले हे रस्ते काही ठिकाणी जेमतेम तीस ते पस्तीस फूट असल्याचे दिसत आहे. या रस्त्यावर गटारे बांधण्याची कामे सुरू आहेत. गटारांचा मार्ग काही ठिकाणी इमारतींच्या खालून काढण्यात आला आहे. पालिका अधिकारी आणि स्थानिक व्यापारी, रहिवासी यांच्या संगनमताने या दोन्ही रस्त्यांचा विचका करण्यात आला आहे, अशी माहिती कल्याण (पूर्व) भागातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत दिली.
काटेमानिवली ते पोटे इमारतीपर्यंतच्या पालिकेच्या विकास आराखडय़ातील मूळची चाळीस फूट रुंद रस्त्यावरील अतिक्रमणे न तोडण्यात यावीत, अशी लोकप्रतिनिधींची मागणी आहे. या रस्त्यावरून सतत वर्दळ असते. रिक्षा, बस वाहतुकीमुळे हा रस्ता वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडला आहे.
या रस्त्यावरील अतिक्रमणांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. नियमबाहय़ सुरू असलेली गटारांची बांधकामे थांबवण्यात यावीत, अशी लक्षवेधी राष्ट्रवादीचे नगरसेवक नीलेश शिंदे यांनी सभेत मांडली होती.
रस्त्याचे समान पद्धतीने विस्तारीकरण करताना जी दुकाने, गाळे रस्त्यामध्ये येतात. त्या व्यापाऱ्यांकडून पालिकेचे अधिकारी पैसे घेतात. त्या व्यापाऱ्यांच्या बेकायदा बांधकामाला पालिकेचे अधिकारी हात लावत नाहीत. जेथे पैसे मिळत नाहीत, तेथे मात्र हे अधिकारी धडाक्यात कारवाई करतात. त्यामुळे काटेमानिवलीतील रस्ता काही ठिकाणी तीस फूट तर काही ठिकाणी अवघा वीस फूट आहे, अशी माहिती मनसेचे नगरसेवक शरद गंभीरराव यांनी सभेत दिली.
कल्याण (पूर्व)मधील दुर्गानगर भागात विकास आराखडय़ातील रस्त्यामध्ये दोन माळ्यांची बेकायदा इमारत बांधण्यात आली आहे. या भागात रिक्षाचालकांना वाहन नेणे अवघड होते. या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी रिक्षाचालकांनी आंदोलन केले होते. या रस्ते कामाची तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी पाहणी करून उपायुक्त सुरेश पवार, सुनील लहाने यांना याबाबत अहवाल देण्यास सांगितले होते. या रस्त्यावरील बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश दिले होते. पवार, लहाने यांनी या बांधकामांवर गेल्या दोन महिन्यांत काही कारवाई केली नाही, असे नगरसेवक प्रकाश पेणकर यांनी सांगितले.
काही ठिकाणी इमारती विकास आराखडय़ातील रस्त्यात येत असल्याने त्या इमारती न तोडता त्या इमारतींखालून गटारे बांधण्याची कामे सुरू आहेत. गटारांची कामे निकृष्ट दर्जाची बांधण्यात येत आहेत, अशी माहिती नगरसेविका माधुरी काळे, उदय रसाळ यांनी दिली. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना हे विषय हाताळता येत नाहीत म्हणून रस्तेकामांची पाहणी करण्यासाठी सेनेच्या युवा नेत्यांना कल्याणमध्ये यावे लागते, अशी टीका सचिन पोटे यांनी केली. या वेळी सेनेचे नगरसेवक चवताळले.
उपायुक्त सुरेश पवार यांनी सांगितले, नगररचना विभागाकडून रस्त्यात येणाऱ्या बांधकामांवर खुणा करून घेऊन त्या तोडण्याची कारवाई करण्यात येईल. त्यावर आतापर्यंत नगररचना विभागाचे मार्गदर्शन न घेता रस्त्यावरील पाडकाम सुरू आहे का, असा प्रश्न नगरसेवक मंदार हळबे यांनी केला.