वसईतील एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद; देखभालीचाही प्रस्ताव रखडला

कल्पेश भोईर, वसई

वसई विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव वाढलेला असताना दुसरीकडे वसईतील एकमेव श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद पडल्याची बाब उघड झाली आहे. पालिकेने मात्र श्वान निर्बीजीकरण केंद्र पुन्हा सुरू झाल्याचा दावा केला आहे. मात्र तरी ते बंदच असल्याचे आढून आले आहे. गेल्या चार महिन्यांत साडे सहा हजाराहून अधिक जणांना श्वान दंश झाल्याचा घटना वसई-विरार भागात घडल्या असल्याचे समोर आले आहे.

वसई विरार शहरात भटक्या श्वानांच्या वाढत असलेल्या उपद्रवांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.  भटके श्वान नागरिक आणि लहान मुलांवर हल्ला करतात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

वसई पूर्वेतील भागातील नवघर येथे  पालिकेचे श्वान निर्बीजीकरण करण्याचे एकमेव केंद्र आहे. एकाच केंद्रावर संपूर्ण शहाराचा निर्बीजीकरणाचा भार आहे. त्या केंद्रामार्फत शहरात फिरणाऱ्या भटक्या श्वानांना लस देऊन त्याचे निर्बीजीकरण केले जात आहे. दिवसातून १८ ते २० श्वानांचे निर्बीजीकरण केले जात आहे. आजवर २५ हजारांहून अधिक श्वानांचे निर्बीजीकरण झाले असल्याची माहिती महापलिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

मात्र असे जरी असले तरी रस्त्यावर फिरणारे भटके श्वान मोठय़ासंख्येने वाढले आहेत. इतक्या वेगाने श्वानदंशाच्या घटना घडत असून पालिका प्रशासन या घटनेला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप शिवसेनेच्या गटनेत्या आणि नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी केला आहे. वसई-विरार मध्ये श्वान निर्बिजीकरणाची दोन केंद्रे प्रस्तावित आहेत, मात्र त्याचे काम रखडलेले असल्याने सध्या शहरात श्वानांचा उपद्रव वाढला आहे. याला नियंत्रणात आणण्यात पालिकेला अपयश आले आहे, असे किरण चेंदवणकर यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत १० हजार श्वानांचे निर्बिजीकरण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

श्वानांच्या देखभालीसाठीची शाळाही रखडली

महापलिकेचे सध्या वसई नवघर परिसरात एकमेव निर्बीजीकरण केंद्र आहे त्यामुळे संपूर्ण भार हा एकाच केंद्रावर आहे.  पालिकेने निर्बीजीकरण केंद्रासाठी दोन ठिकाणी जागा निश्चित केल्या होत्या. त्यात प्रभाग समिती ‘सी’ मध्ये विरार येथील चंदनसार या ठिकाणी तर दुसरे प्राभाग समिती ‘ई’ मध्ये नालासोपारा येथील निर्मळ याठिकाणी जागा प्रस्तावित  होत्या. परंतु अजूनही त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम न झाल्याने ही दोन्ही केंद्रे रखडली आहेत. श्वान निर्बिजीकरण केंद्रासाठी जागा मागितली होती. तेव्हा  पालघरच्या केळवे येथे पाच एकर जागा देण्याची तयारी जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शवली होती. मात्र तेथे जाणे गैरसोयीचे ठरणार होते. त्यामुळे ती जागा देखील बारगळली. श्वान निर्बिजीकरण केंद्र आणि श्वानांची शाळा सुरू करण्याचा  पालिकेचा मनोदय होता. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांना जागा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. जागा देणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेचे नाव  त्या केंद्राला देण्यात येणार होते. जी भटकी श्वान आजारी असतील, जर्जर झालेली असतील त्यांचा सांभाळ आणि देखभाल या शाळेत करण्यात येणार होती. मात्र त्याला देखील प्रतिसाद मिळालेला नाही.

 

श्वानदंशाच्या घटना

जानेवारी-       १२९७,

फेब्रुवारी-        १४७८

मार्च-          २००५,

एप्रिल-         १८९२

एकूण-         ६६७२

वसई-विरार महापालिकेचे निर्बीजीकरण केंद्रामार्फत रोज श्वान निर्बीजीकरण लस देण्याचे काम केले जात आहे. दररोज १८ ते २० श्वानांचे निर्बीजीकरण केले जात आहे. फक्त एक ते दोन दिवस श्वान निर्बीजीकरण केंद्र बंद होते. त्यानंतर हे केंद्र पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

-विजय पाटील, श्वान निर्बिजाकरण केंद्र व्यवस्थापक