घोडबंदर भागात सर्वाधिक, तर मुंब्रा आणि वागळेमध्ये सर्वात कमी वसुली

आर्थिक मंदीच्या वातावरणात बांधकाम क्षेत्रात आलेल्या मरगळीमुळे महापालिका शहर विकास विभागाच्या उत्पन्नवसुलीला ओहोटी लागली असताना, मालमत्ता कराच्या वसुलीत ३५ कोटींची वाढ झाल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर महिनाअखेर मालमत्ता कराची वसुली ५५ टक्क्य़ांपर्यंत झाली असून उर्वरित चार महिन्यांत ४५ टक्के कराची वसुली करण्याचे आव्हान महापालिका प्रशासनापुढे आहे. मालमत्ता कराची सर्वाधिक वसुली घोडबंदर विभागासाठी असलेल्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये, तर सर्वात कमी वसुली मुंब्रा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये झाली आहे.

ठाणे महापालिका अर्थसंकल्पामध्ये विविध विभागांना उत्पन्नवसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. त्यापैकी मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातो. त्यामुळे महापालिकेकडून मालमत्ता करवसुलीवर सर्वाधिक भर दिला जातो. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता करापोटी ५५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. त्यापैकी ५२५ कोटी रुपयांच्या कराची वसुली झाली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी ६५० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले असून नोव्हेंबर महिनाअखेपर्यंत ३५४ कोटी रुपयांची वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ३१९ कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराच्या वसुलीत ३५ कोटींची वाढ झाल्याचे समोर आले आहे.

ठाणे महापालिका मुख्यालय आणि नऊ प्रभाग समिती स्तरावर मालमत्ता कराची वसुली करण्यात आली. त्यामध्ये घोडबंदर परिसरासाठी असलेल्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत सर्वाधिक म्हणजेच १०५ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली झाली आहे. घोडबंदर परिसर मालमत्ता कर भरण्यात आघाडीवर असल्याची बाब आकडेवारीतून समोर आली आहे, तर मुंब्रा आणि वागळे हा

परिसर मालमत्ता कर भरण्यात पिछाडीवर असून मुंब्य्रातून १० कोटी, तर वागळेतून १३ कोटी रुपयांच्या मालमत्ता कराची वसुली झाली आहे. असे असले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या भागातील करवसुलीत थोडीफार वाढ झाल्याचे चित्र आहे.