ठाण्यातील महसूल कार्यालयाचा भार हलका
ठाणे, भाईंदर आणि नवी मुंबई या शहरी पट्टय़ाचा भार वर्षांनुवर्षे पेलणाऱ्या ठाणे महसूल कार्यालयाच्या त्रिभाजनाच्या हालचालींना अखेर वेग आला आहे. जात, उत्पन्न, अधिवास यासारख्या महत्त्वाच्या दाखल्यांसाठी नवी मुंबई आणि भाईंदर परिसरातील रहिवाशांनाही ठाणे महसूल कार्यालयात जोडे झिजवावे लागतात. हे लक्षात घेऊन या कार्यालयाचे त्रिभाजन करून तिन्ही शहरांमध्ये महसूल विभागाशी संबंधित कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पुन्हा पटलावर घेतला आहे. असे झाल्यास आपल्या शहरांमध्येच महत्त्वाचे दाखले मिळण्याची सुविधा ठाणे, नवी मुंबई आणि भाईंदरकरांना उपलब्ध होऊ शकणार आहे.
ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर या तीन शहरांच्या लोकसंख्येने एव्हाना ४० लाखाचा आकडा ओलांडला आहे. ठाणे आणि पालघर या दोन नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीनंतर महसूल कार्यालयातील कामकाजाचे विकेंद्रीकरण केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात ती योजना अमलात येत नव्हती. त्यामुळे जात, अधिवास, उत्पन्न यांसारखे दस्तावेज मिळवण्यासाठी नवी मुंबई व मीरा-भाईंदरमधील नागरिकांना ठाण्यात खेटे मारावे लागत होते. याचा ताण ठाण्यातील महसूल कार्यालयाच्या कामकाजावर पडत होता. दाखले मिळण्याची प्रक्रिया सोयीची व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सेतूसारखा प्रयोग राबविला असला, तरी महसूल कार्यालयावर पडणारा भार बराच मोठा आहे. या पाश्र्वभूमीवर महसूल खात्याने ठाणे, नवी मुंबई आणि भाईंदर या तीन्ही विभागांना स्वतंत्र कार्यालय देण्याचा प्रस्ताव आखला आहे. यासंदर्भातील प्रस्तावास महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी अनुकूलता दाखवली असल्याचे सूत्रांनी सांगितले.