नव्वदीच्या दशकात आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाचे वारे वाहू लागल्यानंतर अनेक नव्या गोष्टी भारतात आल्या. दूरदर्शन या सरकारी वाहिनीपुरत्या मर्यादित असलेल्या दूरचित्रवाणी माध्यमाचे शेकडो खाजगी अवतार उपग्रह प्रक्षेपण सुविधेद्वारे उपलब्ध झाले. किमान शुद्धतेची खात्री असलेले पेयजल बाटलीबंद अवस्थेत याच काळात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले. ऐंशीच्या दशकापर्यंत आपल्या देशात कार, ट्रक इ. वाहनांच्या रेडिएटरमध्ये पाणी वापरले जात होते. अगदी १९९७-९८ पर्यंत मोजकी वाहने सोडली तर बहुतेक वाहनांच्या रेडिएटरमध्ये पाणीच वापरले जात होते. मारुतीने भारतीयांना ‘कुलंट’ चा परिचय करून दिला.

मारुती गाडय़ांमध्ये पाण्याऐवजी कुलंट वापरले जाऊ लागले. उष्णतावहन, इंजिन, वॉटर सर्किट, रेडिएटर गंजू न देणे आणि अतिथंड प्रदेशात कुलिंग सिस्टीममधील द्रव पदार्थाचा प्रवाहीपणा कायम राखणे हे कुलंटचे मुख्य कार्य. सर्वसाधारणपणे ‘इथिलिन ग्लायकॉल’ या पेट्रोलियमजन्य पदार्थापासून ते तयार केले जाते.

मुंबईत शंकर नातू यांनी कुलंट निर्मिती सुरू केली. या कुलंटची एजन्सी त्यांनी त्यांचे ठाण्यातील भाचे शिशिर जोग यांना दिली. त्यावेळी नुकताच संगणकाच्या सुटय़ा भागांचा व्यवसाय सुरू केलेल्या जोगांनी त्यासोबत कुलंटची विक्री सुरू केली. कालांतराने शंकर नातू यांनी परदेशातील कार्यव्यस्ततेमुळे कुलंटचे उत्पादन बंद केले. मात्र तोपर्यंत मॅकेनिकल इंजिनिअरिंग आणि मार्केटिंगमध्ये एमबीए केलेल्या शिशिर जोगांना कुलंट उत्पादनात नवी व्यवसाय संधी दिसली होती. त्यामुळे स्वतंत्ररीत्या संशोधन करून त्यांनी ठाण्यात कुलंट निर्मिती सुरू केली. सुरुवातीला महाराष्ट्र आणि नंतर पश्चिम भारतात त्यांनी कुलंट विक्री सुरू केली. त्याला जोडून ऑटोमोबाईलसाठी लागणाऱ्या इतर सुटय़ा भागांची विक्रीही त्यांनी सुरू केली.

१९९७-९८ च्या आखाती युद्धामध्ये पेट्रोलियमजन्य पदार्थाचे भाव प्रचंड वाढले. साहजिकच त्यात इथिलिन ग्लायकॉलचाही समावेश असल्याने कुलंटच्या निर्मिती खर्चात वाढ झाली. त्यावेळी काही ग्राहकांनी चर्चा करताना इथिलिन ग्लायकॉलशिवाय कुलंट तयार करण्याची कल्पना शिशिर जोगांना सुचली. त्यानंतर पाच वर्षांच्या संशोधनानंतर ‘कोल्डगार्ड अ‍ॅक्टिव्ह’ हे इथिलिन ग्लायकॉलविरहित पर्यावरणस्नेही कुलंट बनविण्यात त्यांना यश आले.

ट्रेंडसेटर्स

इथिलिन ग्लायकॉल म्हणजेच कुलंट अशी धारणा झालेल्या ग्राहकांचा या नव्या उत्पादनावर विश्वास बसण्यास काही काळ जावा लागला. इथिलिन ग्लायकॉलविरहित कुलंट तयार करणे जितके अवघड, तितकेच कठीण त्याची विक्री करणे होते. मात्र शिशिर जोग आणि त्यांच्या टीमने ते आव्हान स्वीकारले. मान्यताप्राप्त प्रयोगशाळांमधील चाचण्यांचे रिपोर्ट, ग्राहकांशी थेट संपर्क, कॅपेन्स, सॅम्पलिंग इ. गोष्टींचा अवलंब केल्याने सिंथेटिक कुलंटची उपयुक्तता लोकांना पटू लागली. अवघ्या एक-दोन वर्षांच्या कालावधीत हे नवे कुलंट भारतभर पोचले. त्यासाठी ग्राहकांची शिफारस महत्त्वाची ठरली. भारतभर वितरकांचे जाळे निर्माण झाले. अधिकाधिक ग्राहकांची पसंती मिळाल्याने गेल्या दशकात एक तांत्रिकदृष्टय़ा अव्वल आणि भारतात मोठय़ा प्रमाणात विकले जाणारे कुलंट म्हणून कोल्डगार्ड अ‍ॅक्टिव्ह सिंथेटिक कुलंट नावारूपाला आले. कोल्डगार्ड पर्यावरणस्नेही आणि किफायतशीरही आहे. कारण इथिलिन ग्लायकॉलपासून बनविलेले कुलंट त्यात निम्मे पाणी टाकून वापरता येते. त्या तुलनेत हे नवे कुलंट खूपच चांगले, कारण ते तब्बल नऊपट पाणी मिसळून वापरता येते. विशेष म्हणजे ज्या कंपन्या पूर्वी इथिलिन ग्लायकॉलपासून कुलंट बनवीत होत्या, त्यांनीही नंतर अशा प्रकारे सिंथेटिक कुलंट बनविण्यास सुरुवात केली. त्या अर्थाने कोल्डगार्ड हे ट्रेंडसेटर उत्पादन ठरले. भारतात १५० वितरण केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्येही ते विकले जाते.

पाताळगंगा येथे लवकरच दुसरा प्रकल्प

साधारणत: कारमध्ये पाच लिटर, तर ट्रकमध्ये ३० लिटर कुलंट लागते. वाहनांनी ४० हजार ते एक लाख किलोमीटर अंतर कापल्यानंतर कुलंट बदलावे लागते. टॅक्टर, जनरेटर तसेच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांमध्येही कुलंट वापरले जाते.

दहा बाय दहाच्या गाळ्यामध्ये तुटपुंज्या भांडवलावर शिशिर जोग यांनी कुलंट निर्मितीचा व्यवसाय सुरू केला होता. आता वागळे इस्टेटमधील विस्तीर्ण जागेत पी.एस. ऑटो प्रा. लि. या कंपनीद्वारे कोल्डगार्ड कुलंटची निर्मिती केली जाते. सध्या या कारखान्यात सरासरी प्रतिदिन १० ते १५ हजार लिटर्स कुलंटची निर्मिती होते. अर्धा लिटर ते २१० लिटर इतक्या विविध पॅकिंगमध्ये कोल्डगार्ड उपलब्ध आहे. लाल, हिरवा, निळा आणि गुलाबी अशा चार रंगांमध्ये ‘कोल्डगार्ड’ उपलब्ध आहे. लवकरच पाताळगंगा येथे दुसरा प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती शिशिर जोग यांनी दिली.

ग्राहकाभिमुख दृष्टिकोन, गुणवत्ता, पारदर्शक व्यवहार आणि दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती यामुळे पी.एस.ऑटोचे कोल्डगार्ड देशात तसेच परदेशातही लाखो ग्राहकांचा विश्वास संपादन केलेल्या ‘पी.एस. ऑटो’च्या ‘कोल्डगार्ड’ अ‍ॅक्टिव्ह उद्योगाने आयएसओ आणि क्रिसिल प्रमाणपत्र मिळविले आहे.