परमार प्रकरणी नगरसेवकांच्या नाराजीनंतर आमदारांकडून फलकबाजी
ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शहरभर लावलेल्या फलकांची जोरदार चर्चा येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे. या फलकांवर मुल्ला यांचा उल्लेख आव्हाड यांनी ‘लहान भाऊ’ असा केला असून वर्तकनगर, समतानगरच्या नाक्यावर लावलेल्या या भल्यामोठय़ा फलकांचा राजकीय अर्थही काढला जात आहे.
परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी मुल्ला आणि पक्षाचे अन्य एक नगरसेवक हणमंत जगदाळे यांना अटक झाली असून राष्ट्रवादीतील पक्षश्रेष्ठींकडून या नगरसेवकांच्या नातेवाईकांची साधी विचारपूसही केली जात नसल्याचा आरोप करीत त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी मध्यंतरी नाराजीचा सूर आवळला होता. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या ठाणे शहरातील कार्यक्रमासही २२ नगरसेवक गैरहजर राहीले होते. हा एक प्रकारे दबावतंत्राचा भाग असल्याची चर्चा एकीकडे रंगली असताना मुल्ला यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून आव्हाड यांनी ‘माझा लहान भाऊ’ असा उल्लेख करीत शहरभर फलकबाजी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्ताने दरवर्षी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ठाण्याच्या सेंट्रल मैदानात भव्य क्रिकेट सामने भरविण्यात येतात. परंतु कारागृहात बंदिस्त असल्यामुळे नजीब मुल्ला यांचा यंदा वाढदिवस साजरा होणार नसल्याची शहरात चर्चा सुरू होती. असे असताना मुल्ला यांचे अभिनंदन करण्यासाठी आव्हाडांनी पुढाकार घेत वाढदिवसाचे कार्यक्रम राबविण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. नजीब मुल्ला हे आव्हाड यांचे कट्टर समर्थक म्हणून शहरात ओळखले जातात.