मुंबईसहित राज्यभरात दहीहंडी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकींआधीची ही शेवटची दहीहंडी असल्याने अनेकांनी आपली राजकीय ताकद दाखवून देण्यासाठी यंदा कंबर कसली आहे. त्यामुळे अगदी दादरपासून ते पुण्यापर्यंत अनेक ठिकाणी हंड्यांचे थरावर थर लावले जात आहेत. मात्र या दहीहंडी आयोजकांच्या यादीमध्ये मागील काही वर्षांपासून गायब असणारे नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. जितेंद्र आव्हाड यांनी मागील दोन वर्षांपासून दहीहंडीचे आयोजन बंद केले आहे. यावर्षीही त्यांनी दहीहंडीचे आयोजन केले नसले तरी ते दहीहंडी आयोजनच्या आठवणींमध्ये असल्याचे त्यांनीच आपल्या ट्विटर अकाऊण्टवरून सांगितले आहे.

ठाणे आणि मुंबईमध्ये मोठी बक्षिसाची रक्कम आणि उंच थरांच्या दहीहंड्या लावण्याची सुरवात करणाऱ्या राजकारण्यांपैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड. दहीहंडीचा उत्सव आजसारखा लोकप्रिय होण्याआधी ठाण्यातील लोकप्रिय असणाऱ्या दोन दहीहंड्यांपैकी पहिली म्हणजे टेंभी नाक्याला आनंद दिघे आयोजित करायचे ती शिवसेनेचे दहीहांडी आणि दुसरी पाचपाखाडी येथील ओपन हाऊसच्या चौकात लागायची ती जितेंद्र आव्हाड यांची हांडी. ठाण्याबरोबरच मुंबई-पुण्याचीही अनेक मंडळे ही दहीहंडी फोडण्यासाठी दरवर्षी ठाण्यात दाखल होत असतं. मात्र दोन वर्षापूर्वी दुष्काळाचे कारण देऊन आव्हाड यांनी दहीहंडीचे आयोजन केले नाही तर मागील वर्षी थरांवरून झालेल्या वादामुळे आव्हाड यांनी दहीहंडीचे आयोजन केले नाही. या वर्षीही आव्हाड यांनी हंडीचे आयोजन केलेले नाही. मात्र आव्हाड यांनी आपण दहीहंडीच्या काळातील सर्व गोष्टी मीस करत असल्याचे ट्विट केले आहे. या ट्विटबरोबर त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवरील एका व्हिडीओची लिंक दिली असून या व्हिडीओमध्ये आव्हाड यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यातील क्षणचित्रे आणि व्हिडीओच्या क्लिप्स आहेत.

अनेक वर्षांपासून ठाण्याची दहीहंडी म्हटल्यावर त्यामध्ये आव्हांडांच्या संघर्ष प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या पाचपाखाडीच्या दहिहंडीचे नाव आवर्जून घेतले जायचे. आव्हाड यांनीच पहिल्यांदा स्पेनमधील मानवी मनोरे रचणाऱ्यांना मुंबईच्या दहीहंडीच्यानिमित्ताने भारतीयांसमोर कसब दाखवण्याची संधी दिली. बक्षिसाची मोठी रक्कम, नऊ थरांसाठी केले जाणारे प्रयत्न, कलाकारांची उपस्थिती आणि मानाची हंडी म्हणून ओळखली जाणारी आव्हाड यांची हंडी रद्द झाल्याने गोविंदा पथकांची मागील काही वर्षांपासून निराशा होत असल्याची चर्चा आहे.

एकीकडे आव्हाड यांनी आयोजन रद्द करण्याची हॅट-ट्रीक केली असली तरी मागील वर्षीपर्यंत आव्हाड यांच्यासोबतीने दहीहंडी आयोजनाला बगल देणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी या वर्षी दहीहंडीचे जंगी आयोजन केले आहे. त्याशि्वाय टेंभी नाक्याची आनंद दिघेंची हांडी आणि भगवती मैदानातील मनसेची हंडी फोडण्यासाठी यंदाच्या वर्षी गोविंदापथकांमध्ये चढाओढ सुरु आहे.