खासगी सुरक्षा व्यवस्थेच्या मनमानी कारभाराने नागरिक त्रस्त
कल्याणमधील सुशोभित करण्यात आलेल्या काळा तलावात एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने या तलावाच्या सुरक्षा व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. तलावाची सुरक्षा व्यवस्थेचे काम एका नगरसेवकाशी संबंधित असलेल्या खासगी सुरक्षा एजन्सीला देण्यात आले आहे. परंतु या एजन्सीचा मनमानी कारभारानेनागरिक त्रस्त झाले असून आता मृतदेह आढळल्याने या एजन्सीचा भोंगळ कारभारही चव्हाटय़ावर आला आहे.
रहिवाशांना सर्व सुविधांचा लाभ घेता यावा. तलावाच्या परिसरात कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत, म्हणून खासगी सुरक्षा एजन्सीला दिले आहे.ही एजन्सी एका नगरसेवकाशी संबंधित असल्याने हा तलाव म्हणजे आपली मालमत्ता आहे, असे समजून मनमानी पद्धतीने तलावाच्या प्रवेशद्वाराला कुलूप लावणे, कधी तरी प्रवेशद्वार खुले ठेवणे असे प्रकार या एजन्सीमार्फत राजरोसपणे सुरू असतात.
काळा तलाव महापालिकेच्या नियंत्रणाखाली असलेली सार्वजनिक सुविधा आहे, असे असताना या ठिकाणी मुख्य प्रवेशद्वाराला कुलपे लावणे असे प्रकार वारंवार का केले जात आहेत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकारांमुळे या भागात शतपावलीसाठी येणारे रहिवाशी नाराज झाले आहेत.
सुरक्षा रक्षक एजन्सीला महापालिकेकडून सुमारे पन्नास लाखाचे काम सोपविण्यात आले आहे. हे सुरक्षा रक्षक तलाव परिसरात टेहळणीचे काम योग्य पद्धतीने करत नाहीत, अशी तक्रारही केली जात आहे. सुरक्षा रक्षक असताना काळा तलावात तरुणीचा मृतदेह कसा सापडला, असा सवालही उपस्थित केला जात आहे. काळा तलावाचे प्रवेशद्वार सकाळी उघडल्यानंतर ते किमान रात्री उशिरापर्यंत सुरू राहील याची काळजी पालिकेने घ्यावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे परंतु सध्याचे सुरक्षा रक्षक दुपारी दोन ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेशद्वार बंद ठेवतात.
त्यामुळे अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी जागा नसल्याने इतरत्र भटकत बसतात.काळा तलाव दिवसभर चालू ठेवला. तर या भागात सतत वर्दळ राहील आणि तलावात आत्महत्येसारख्या दुर्घटना घडणार नाहीत, अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत.
स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांच्या प्रभागात काळा तलाव परिसर येतो. त्यांचेही काळा तलावाच्या सुरक्षिततेकडे लक्ष नसल्याची टीका रहिवाशांकडून केला जात आहे.

अनेक रहिवासी, पादचाऱ्यांनी काळा तलाव प्रवेशद्वार खुले ठेवण्याबाबत तसेच तेथे सक्षम सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी केली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेला घेण्यात आला आहे. या विषयावर नागरिकांच्या वेळेचा विचार करून निर्णय घेण्यात येईल.
– संदीप गायकर, सभापती,स्थायी समिती.