बांधकाम बंदीमुळे विकासकांचे ‘आस्ते कदम’
कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नाकार्तेपणाचा प्रतिकूल परिणाम यंदा कल्याणमध्ये भरलेल्या मालमत्ता प्रदर्शनावर दिसू लागला आहे. गेल्या वर्षी या प्रदर्शनात कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर अशा विविध भागांतील सुमारे दहा हजारांहून अधिक गृहप्रकल्प विक्रीसाठी मांडण्यात आले होते. यंदा मात्र हे प्रमाण जेमतेम हजारच्या आसपास येऊन ठेपले आहे. विशेष म्हणजे, कल्याणच्या या प्रदर्शनात कल्याणबाहेरील अधिक गृहप्रकल्प विक्रीसाठी मांडण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने लागू केलेल्या बांधकाम स्थगतीचा मोठा फटका येथील बांधकाम उद्योगाला बसल्याचे चित्र ठसठशीतपणे पुढे येऊ लागले आहे. या मालमत्ता प्रदर्शनात दरवर्षीच्या तुलनेत सहभागी उद्योजकांची संख्या ५० टक्क्य़ांनी घटली आहे.
गृह विक्री उद्योगाला गती मिळावी तसेच सगळ्या विकासकांचे एकत्रीकरण व्हावे या उद्देशाने ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री’च्यावतीने कल्याणच्या लालचौकी येथील फडके मैदानामध्ये मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या प्रदर्शनात घर खरेदीसाठी इच्छुकांची मोठी गर्दी उसळत असते. मात्र, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नसल्याच्या कारणावरून उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली शहरांत नवीन बांधकामांना बंदी घातल्याचा फटका यंदाच्या प्रदर्शनाला बसू लागला आहे. कल्याण महापालिकेच्या हद्दी बाहेरील प्रकल्पांना मात्र त्यामुळे सुगीचे दिवस आल्याचे चित्र असून यंदाच्या प्रदर्शनात अशा विकासकांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. अंबरनाथ, बदलापूर, वांगणी, शेलू, भिवपुरी, कर्जत तर टिटवाळा, शहापूर, मुरबाड, पुण्यातील विकासकांनीही या प्रदर्शनात हजेरी लावली आहे, अशी माहिती एमसीएचआयच्या वतीने देण्यात आले. कल्याण आणि पुढील परिसरात अनेक प्रकल्प राबवत असलेल्या मोहन ग्रुप या बांधकाम समूहाचे संचालक अमर भाटीया यांच्या आत्महत्येमुळे यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनामध्ये या समूहाचा सहभाग नव्हता.

घर खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांना ८ लाखांपासून कोटय़वधी किमतीची घरे या प्रदर्शनात उपलब्ध असून आत्तापर्यंत प्रदर्शनात सुमारे २३ हजारांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. तर शंभरहून अधिक मंडळींनी घरे खरेदी केली आहेत. कल्याणमधील नव्या विकासकांना बांधकाम परवानगी नसल्याने त्यांची कमतरता या प्रदर्शनात जाणवते आहे. मात्र या परवानग्या मिळाव्या यासाठी एमसीएचआयच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
– सुधीर सैलवाल, प्रदर्शन आयोजक.

मालमत्ता प्रदर्शनाला पहिल्या दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी इतकेच स्टॉल यंदा उपलब्ध असून सगळे हाऊसफुल्ल आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घरे खरेदी करणाऱ्यांची संख्याही चांगली आहे. महापालिका हद्दीतील बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पांतील घरांचीच विक्री या प्रदर्शनात होत असून नवे प्रकल्प घेऊन येणाऱ्यांनी मात्र यंदा सहभाग घेतला नाही. त्यामुळे अशा नव्या विकासकांची संख्या यंदाच्या प्रदर्शनात कमी आहे.
– प्रफुल्ल शहा, एमसीएचआय, कल्याण-डोंबिवली युनिट