हर्षद कशाळक Sharshad.kashalkar@expressindia.com

व्यावसायिक स्पर्धेतून त्यांनी आपल्या प्रतिस्पध्र्याचा काटा काढण्याचा कट रचला होता. निर्मनुष्य असलेल्या जागी प्रतिस्पध्र्याला गाठून त्याची हत्या करण्यात आली. हे प्रकरण अंगाशी येऊ  नये याची खबरदारी घेतली होती. पण तपासाची चक्रे फिरली आणि दोघेही पोलिसांच्या जाळ्यात सापडले..

कर्जत तालुक्यातील राष्ट्रवादीचे तालुका चिटणीस प्रताप दाभाडे यांची गेल्या सप्टेंबर महिन्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे कर्जत परिसरात एकच खळबळ उडाली होती. पक्षातील ज्येष्ठ सदस्याच्या हत्येमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. पोलिसांसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या घटनेचा तातडीने छडा लावण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यामुळे पोलिसांसमोर गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे निर्देश कर्जत पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना दिले होते, तर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. पोलीस निरीक्षक जे. ए. शेख या तपास पथकाचे नेतृत्व करत होते. पोलीस उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकुल यांच्याकडे तपास पथकांमधील समन्वयाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

१ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रताप दाभाडे कामानिमित्त रिव्हर टच रिसॉर्टवर गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने अनेक वेळा त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण समोरून कुठलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यांनी दाभाडे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. गावातील काही मंडळी रिव्हर टच रिसॉर्टच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने दाभाडे यांना शोधत आली. यावेळी रिव्हर टचकडे जाणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूला एका पायवाटेलगत दाभाडे यांची मोटारसायकल दिसून आली, तर शेत जमिनीतील एका चरीमध्ये दाभाडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात दिसून आला. धारदार शस्त्राने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर वार करण्यात आले होते.

हे वृत्त काही क्षणातच कर्जत परिसरात पसरले. काही काळ तणावही निर्माण झाला. दाभाडे हे राजकीय पक्षाचे पुढारी असल्याने वातावरण अधिकच तापले होते. कर्जतच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी न्यायवैद्यक पथक आणि श्वान पथकालाही तातडीने बोलावून घेतले. स्थळ पाहणी आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. दाभाडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. तपास सुरू करण्यात आला, पण हाती काही लागत नव्हते. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला तपासासाठी उतरवण्यात आले. एकाच वेळी दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर तपास सुरू झाला. मोबाइल लोकेशन, सीडीआर रिपोर्ट तपासले गेले. दाभाडे या घटनेपूर्वी कुणाच्या संपर्कात होते याचा शोध घेण्यात आला. खबऱ्यांमार्फत माहिती संकलित केली गेली. दाभाडे यांचे राजकीय आणि व्यावसायिक संबंध तपासले गेले. यातून मिळालेल्या माहितीचे काटेकोर आणि बारकाईने विश्लेषण केले. या माहितीची पडताळणी केल्यानंतर दोन नावे पुढे आली. पोलिसांनी संशयित म्हणून त्यांना ताब्यात घेतले.

सुरुवातीला ते आपल्या गुन्ह्याची कबुली देत नव्हते. पण पोलिसी हिसका दाखवताच दोघांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली. दाभाडे आणि आरोपी हे दोघेही बांधकाम व्यावसायिक होते. बांधकाम साहित्य पुरवणे आणि बांधकामाचे ठेके घेणे यांसारखी कामे ते करत असत. पण प्रताप दाभाडे हे आपल्या राजकीय पदाचा वापर करून सर्व कामे स्वत:कडेच घेत. त्यामुळे आरोपींचे व्यावसायिक नुकसान व्हायचे. हे नुकसान टाळण्यासाठी दाभाडे यांचा काटा काढण्याचा कट या दोघांनी रचला. त्यांच्यावर दोघेही पाळत ठेवून होते. रिव्हर्स टच रिसॉर्टमधून काम आटोपून परतणाऱ्या दाभाडे यांना दोघांनी निर्मनुष्य ठिकाणी गाठले आणि त्यांना जबर मारहाण करून त्यांची हत्या केली. पोलिसांनी तपास कौशल्याच्या जोरावर या गुन्ह्याची उकल केली. दाभाडे यांना मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेली लाकडी काठी आणि धारदार वस्तूही ताब्यात घेतली. पंढरीनाथ आगज आणि तानाजी नाईक यांना दाभाडेंचा खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

या तपासात कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे प्रमुख जे. ए. शेख, साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. सस्ते, पोलीस हवालदार बी. डी. कराळे, सागर शेवते, सुभाष पाटील, संदीप चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.