कृष्णाधाम, बाजारपेठ परिसर, बदलापूर (प).

जात आणि उपजातींप्रमाणेच हल्ली भाषिक अस्मितांचा मुद्दाही संवेदनशील बनला आहे. अनेकदा राजकीय स्वार्थासाठी या दुराव्याला प्रोत्साहन दिले जाते. मात्र महानगरीय संस्कृतीतील काही नव्या गृहसंकुलांमध्ये जाती-धर्माच्या भिंती कधीच गळून पडल्या आहेत. बदलापूर पश्चिम विभागात बाजारपेठेलगत असलेल्या कृष्णाधाम सोसायटीला भेट दिल्यानंतर त्याचा प्रत्यय येतो.

गेल्या काही वर्षांत भाषिक अस्मितांमुळे अनेक ठिकाणी वादविवाद होताना दिसतात. त्यातून एकमेकांमधील एकोपा, शेजारधर्मच पणाला लागल्याच्या घटना घडतात. बदलापूर पश्चिमेतील कृष्णधाम सोसायटी मात्र या सर्व गोष्टींना अपवाद ठरली आहे. तळमजला आणि तीन मजले अशा स्वरूपात असलेल्या या सोसायटीत एकूण ३२ सदनिका आहेत. तब्बल २० हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या कृष्णाधाम सोसायटीत विविध भाषिक राहतात. आदित्य पटेल डेव्हलपर्स यांनी विकसित केलेली ही सोसायटी १९९६च्या अखेरीस सदनिकाधारकांना सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर अंजुमन मुंशी यांनी पहिले अध्यक्ष म्हणून सोसायटीचे काम पाहिले होते. सध्या प्रमोद चव्हाण अध्यक्ष तर विठ्ठल शिंत्रे सचिव म्हणून काम पाहतात. बहुभाषिक कुटुंबे असणाऱ्या या सोसायटीत मराठी आणि गुजराती लोकांचा भरणा अधिक आहे. हिंदू, जैन आणि इतर धर्माचे लोक इथे एकोप्याने राहतात. पूर्वी ए, बी, सी आणि डी अशा चार विंगचा समावेश कृष्णाधाम सोसायटीत होता. मात्र प्रशासकीय गाडा हाकणे सोपे व्हावे म्हणून कृष्णाधाम ए, बी अशी वेगळी सोसायटी करण्यात आली. उत्साही सदस्यांच्या कामामुळे सध्या ए आणि बी विंगचा कारभार उत्तमरीत्या सुरू आहे.

सण आणि उत्सवांच्या काळात गृहसंकुलाच्या एकोप्याचे दर्शन घडते. कृष्णाधाम सोसायटीतही मोठय़ा उत्साहात अनेक उत्सव साजरे केले जातात. यात होळी, नवरात्रोत्सव आणि गुढीपाडव्याचा समावेश आहे. राष्ट्रीय सणांनाही सोसायटीत मोठे महत्त्व दिले जात असून स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनही मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. माघी गणेशोत्सव काळात वार्षिक पूजा आयोजित केली जाते. या वेळी संपूर्ण संकुल एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. बहुतेक सोसायटीत मराठी भाषिक आणि जैन धर्मीयांच्या नियमांत वादंग पाहायला मिळत असतात. मात्र कृष्णाधाम सोसायटी यात थोडी वेगळी आहे. या पूजा उत्सवाच्यावेळी जैन धर्मीयांच्या आहाराच्या नियमांचे पालन केले जाते. त्यामुळे धार्मिक भावना जपल्या जाऊन एक वेगळ्या प्रकारचे नाते या सर्वधर्मीयांमध्ये तयार झाले असल्याचे विठ्ठल शिंत्रे सांगतात. सोसायटीत सर्वाना सोबत घेऊन कार्यक्रम साजरे केले जातात. त्यात आबालवृद्ध, महिला व पुरुष बरोबरीने कार्यक्रमाचे नियोजन करीत असतात. बहुतेकदा उत्सव समितीची धुरा महिलांकडे असल्याचे मीनाक्षी देशमुख सांगतात. अनेकदा उत्सवांमध्ये विविध धर्माच्या पारंपरिक वेशभूषेचा ड्रेसकोड असतो. एकोपा वाढण्यास याची मदत होत असल्याचे प्रमोद चव्हाण सांगतात.सोसायटीत २४ तास पाण्याची सेवा देण्याइतकी व्यवस्था आहे. स्थानिक नगरसेवक राजेंद्र घोरपडे यांच्या सहकार्याने सोसायटीत पर्जन्य जलसंचयनाचा प्रयोग यशस्वीरीत्या राबविला जात आहे. तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात पाण्याची समस्या भेडसावत होती. मात्र पर्जन्य जलसंचयनाच्या प्रयोगामुळे सोसायटीच्या आवारात असलेल्या कूपनलिकेची पाणी पातळी चांगल्या प्रकारे वाढली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही कधी पाणीटंचाई जाणवत नसल्याचे सुनील देशमुख सांगतात. त्याबद्दल राजेंद्र घोरपडे यांना ते धन्यवाद देतात.

वर्षांतून दोनदा सोसायटीचे सर्व सदस्य विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करतात. सोसायटीच्या आवारात लहान झाडे लावण्यात आली आहेत. सोसायटीच्या आवारात सध्या तरी जागा असल्याने पार्किंगची समस्या नाही.

बेकायदा पार्किंगचा जाच 

बाजारपेठ जवळ असल्याने वर्दळीचा मुख्य रस्ता सोसायटीजवळून जातो. सोसायटीच्या हद्दीत येणारे चार व्यावसायिक गाळेही येथे आहेत. मात्र त्यांना कोणताही अतिरिक्त कर आकारण्यात येत नाही. विशेष बाब म्हणजे रस्ता रुंदीकरणासाठीही स्थानिक नगरसेवकांच्या आग्रहास्तव सोसायटीने आपल्या हद्दीतील काही जागा देऊ  केली होती. त्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटला. मात्र रेल्वे स्थानक आणि बाजारपेठेशेजारी असल्याने बेकायदा पार्किंगचा फटकाही या सोसायटीला बसतो. वाहनचालक सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर गाडी पार्क करून जात असल्याने त्यांना या पार्किंगचा त्रास सहन करावा लागतो.