भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आठ शाळेत मुख्याध्यापकांची कमतरता आहे, तर पाच महिन्यांपासून शिक्षण सभापतीपद रिक्त असून देखील सभापतींची निवड करण्यात आलेली नाही.

करोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शिक्षणावर जोर दिला जात आहे. मात्र शिक्षण विभागातील तब्बल आठ शाळांमध्ये मुख्याध्यापकांची कमतरता आहे. त्यामुळे मनुष्यबळ आणि अपुऱ्या शिक्षक सुविधेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होणार आहे.

मीरा-भाईंदर क्षेत्रात पालिकेच्या एकूण ३६ शाळा असून त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पंधराशेहूनही अधिक आहे. यात मराठी, उर्दू, हिंदी आणि गुजराती विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शाळेतील वरिष्ठ शिक्षकांची मुख्याध्यापकपदावर निवड करून त्यांवर शाळेची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात येते. २०१८-१९ वर्षांनुसार मुख्याध्यापकपदी २१ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. परंतु त्यातदेखील वर्षभरापासून आठ पदांची पूर्तता करणे शिल्लक आहे. यात मराठी माध्यमांच्या पाच, हिंदी माध्यमांच्या दोन आणि गुजराती माध्यमांच्या एक शाळा आहे.

करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेता ऑनलाइन शिक्षण प्रणाली आणि विद्यार्थ्यांच्या योग्य शिक्षणाकरिता मुख्याध्यापकांची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे लवकरच मुख्याध्यापकांची निवड करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या शिक्षण सभापती ज्योत्स्ना हसनाळे यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून शिक्षण सभापतीपददेखील रिक्त आहे. या संदर्भात शिक्षण अधिकारी ऊर्मिला पारधे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

या संदर्भात आम्ही आयुक्तांना पत्रव्यवहारदेखील केला आहे. अशा प्रकारे शिक्षण व्यवस्थापनेत दुर्लक्षपणा करणे योग्य नाही.

– दीपक जैन,अध्यक्ष, युथ फोरम सामाजिक संस्था

शाळेचे माध्यम        रिक्त संख्या   

मराठी                               ५

हिंदी                                  २

गुजराती                            १