सेवा रस्ता, पथदिव्यांची वानवा; भूमाफियांचे अतिक्रमण, कचऱ्याचे साम्राज्य

कल्पेश भोईर, वसई

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विविध सुविधांची वानवा असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. महामार्गावर सेवा रस्ता, अपघातप्रवण क्षेत्रात उड्डाणपूल नाहीत. अनेक ठिकाणी पथदिव्यांची वानवा आहे, तर भूमाफियांनीही अतिक्रमण केलेले आहे. महामार्गावरील समस्यांचे निवारण होत नसल्याने वाहनचालकांना आणि महामार्गालगत असलेल्या ग्रामस्थांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे. सेवा रस्ता नाही आणि महामार्गाच्या कडेला अनेक अवजड वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडते. अनेक ठिकाणी भूमाफियांनी अतिक्रमण केले आहे. महामार्गालगतच अनेक लहान गावे आहेत, त्या गावांतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी अनेक वर्षांपासून उड्डाणपूल तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र त्याकडेही महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रस्ते ओलांडण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्यापुढे नाही. महामार्गावर संरिक्षत जाळी न बसवल्याने मोकाट जनावरे महामार्गावर येत असतात. त्यामुळे अनेकदा अपघातही घडतात.

महामार्गालगत सुसज्ज असे रुग्णालय नाही. त्यामुळे अपघात झाल्यानंतर जखमींना तात्काळ उपचार मिळत नसल्याचे दिसून आले आहे. महामार्गावर भूमाफियांनी मातीभराव टाकून अतिक्रमण केले आहे. रस्त्याच्या कडेला बेकायदा उपाहारगृहे, टपऱ्या, गॅरेज उभारण्यात आले आहे. त्याशिवाय अनेक गावांतून आणलेला कचरा महामार्गाजवळच टाकला जातो. त्यामुळे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले असून पावसाळ्यात महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचते.

महामार्गावरील समस्या

* सेवा रस्त्याची सोय नाही

* सुसज्ज रुग्णालयाचा अभाव

* अनेक ठिकाणी पथदिवे नाहीत.

* वाहने बंद पडल्यानंतर तात्काळ हटवण्याची यंत्रणा नाही.

* वाढते अतिक्रमण आणि कचऱ्याचा प्रश्न

* महामार्गालगतच्या गावांतील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी उड्डाणूल नाही.

* भटकी जनावरे येऊ नयेत यासाठी संरक्षक जाळ्या नाहीत.

महामार्गावर रात्रीच्या वेळी पथदिव्यांची व्यवस्था नाही. काही ठिकाणी उड्डाणपूल नसल्याने त्याचा फटका बसतो. काही गावांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे बसवले तर एखादा अपघात घडला तर त्यांची माहिती व संबधित वाहनचालक यांची माहिती मिळून अपघातग्रस्त व्यक्तीला मदत मिळू शकेल यासाठी प्राधिकरणाने प्रयत्न केले पाहिजे.

– सुनील मिश्रा, स्थानिक रहिवासी

महामार्गालगतच्या गावांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी उड्डाणपूल तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रशासन इतर ठिकाणच्या महामार्गावर सुविधा देत असते, त्याचप्रमाणे या महत्त्वाच्या महामार्गावरील समस्यांकडे लक्ष द्यावे.

– सुशांत पाटील, अध्यक्ष, भूमिपुत्र फाऊंडेशन

महामार्गावरील ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्याचा प्रयत्न प्राधिकरणामार्फत केला जात आहे. प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणारी कामे पूर्ण करण्यात येतील. महामार्गावर होणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात आहे.

– दिनेश अग्रवाल, महामार्ग प्राधिकरण व्यवस्थापन अधिकारी